Sunday, 9 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 09.09.2018....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 9 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

सत्ता हे जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याचं एक साधन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बेठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीत मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेणारा ‘व्हिजन डॉक्यूमेंट्स २०२२’ नावाचा राजकीय प्रस्ताव पारित करण्यात आला. विरोधी पक्षांनी नकारात्मक राजकारण केल्याचा आरोपही या प्रस्तावात करण्यात आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वासही भाजपनं यावेळी व्यक्त केला. २०२२ पर्यंत गरिबी, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि दहशतवाद मुक्त असा भारत - न्यू इंडियाच निर्माण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. विरोधकांकडे कोणतेही धोरण अथवा ध्येय नाही. त्यामुळे ते अधिक निष्क्रीय ठरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.    

****

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार २०१८ अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांमुळे झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली. मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्याचा पुरस्कार गडचिरोलीला, प्रभावी अंमलबजावणीसाठीचा पुरस्कार गडचिरोलीतल्या नागरी ग्रामपंचायतीला आणि उल्लेखनीय कार्यासाठीचा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या खुटाघर इथल्या ग्राम डाकसेवक नूतन प्रकाश यांना जाहीर झाला आहे.

****

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज पुण्यात मुस्लीम मूक महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा अथवा रंगाचा झेंडा न घेता, तिरंगा ध्वजाच्या मागे मुस्लीम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

मराठवाड्यातल्या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित घट नोंदवली गेली आहे. विभागात पुन्हा एकदा पावसाचा खंड पडल्यामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. मराठवाड्यातल्या ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांत पाण्याचा मुबलक साठा नाही, त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ, जालना एक, बीड आठ, लातूर दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सहा प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९३, बीड १२६, लातूर १३२, उस्मानाबाद २०१, नांदेड ८८, परभणी २२ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या २६ लघु प्रकल्पांत एक ते २३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. नांदेड जिल्ह्याल्या ८८ लघु प्रकल्पांतला पाणीसाठा सात सप्टेंबर अखेर ६९ टक्यांवर पोहचला आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही पावसाळा संपत आला तरी अनेक तालुक्यांत अद्याप ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला, तर कालव्यात वाहून गेलेल्या एका मुलाचा शोध सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या चांभारवाडी इथं आज पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या एका चौदा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. नवनाथ गवळी असं त्या मुलाचं नाव असून, तो वडिलांबरोबर तलावाजवळ गेला होता. नाशिक जिल्ह्यातल्या पाटोदा इथंही खांदेमळणीसाठी पालखेड कालव्यात उतरलेला गोकुळ तनपुरे हा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी पाण्यात वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली.

तर तिसरी घटना यवतमाळच्या पांढरकवडा इथं घडली. खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. सचेतन राठोड, सिद्धेश मोगरकर आणि आदर्श राठोड असं तिघांचं नाव असून, सायकल खेळत असताना तिघेही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं खड्ड्यात पडून बुडाले.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान, औरंगाबाद नजिक वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या कंपन्यांमध्ये तोडफोड करुन कोट्यवधी रुपयांचं नुकसान करण्यात आलं होतं, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या २३ संशयितांचा नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.दिग्रसकर यांनी फेटाळून लावला आहे. तोडफोड करतानाचं सीसीटीव्ही फुटेज बघून या सगळ्यांना अटक करण्यात आली होती. 

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीनं एक सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढून पीक कर्ज वाटपाच्या जाहीर केलेल्या अटी जाचक असल्याचे सांगत, या विरोधात शेतकऱ्यांतर्फे येत्या बुधवारी १२ सप्टेंबरला बॅंकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...