Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 9 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
वाढत्या इंधन दरामधून नागरिकांना
दिलासा देण्यासाठी सरकार विविध प्रस्तावांवर काम करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या कक्षेत आणणं, हा इंधनाची किंमत
कमी करण्याचा एक मार्ग असून, जीएसटी परिषदेनं हा प्रस्ताव पाठवला तर महाराष्ट्र सरकार
त्याला पाठिंबा देईल, असं ते म्हणाले. तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून
असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं पहिल्या तीन वर्षात १३ वेळा इंधनाचे दर कमी
केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
पेट्रोल आणि डिझेलवाढी विरोधात उद्या काँग्रेससह
अनेक विरोधी पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे. या बंद मध्ये लातूरकरांनी सहभागी
व्हावं, असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित
देशमुख यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असताना देशात
ते वाढवले जात आहेत, यामुळे महागाईचा भडका उडाला आहे, असं देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या
निवेदनात म्हटलं आहे. बंद दरम्यान शासकीय, खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही, कोणालाही
इजा पोहचणार नाही याची दक्षता घेत काँग्रेस कार्यकर्ते बंद यशस्वी करतील, असंही त्यांनी
म्हटलं आहे.
दरम्यान, या बंद मध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही
सहभागी व्हावं, असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं
आहे.
****
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज अमेरिकेतल्या शिकागो
इथं आयोजित विश्व हिंदू काँग्रेसच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. स्वामी विवेकानंद
यांनी १८९३ मध्ये शिकागोमध्ये विश्व धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्ष
पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, शिकागो इथं काल तेलगू संघटनेच्या सदस्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी,
अमेरिकेतल्या भारतीय समुदायानं त्यांची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुळं न विसरता
नवीन आणि पुनरुत्थान होत असलेल्या भारताच्या निर्मितीसाठी योगदान
द्यावं, असं आवाहन केलं. सर्व विश्व हे एक कुटुंबच आहे. वसुधैव
कुटुंबकम् ही श्रद्धा आणि भारतीय तत्त्वज्ञानाची मूल्यं कायम राखावीत, असं त्यांनी सांगितलं.
****
देशातून
निरक्षरतेचं निर्मूलन करण्यात विद्यार्थांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते
काल नवी दिल्ली इथं ५२ व्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात
बोलत होते. आगामी काळात संपूर्ण साक्षरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र
काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबातल्या
निरक्षर सदस्यांना शिकवावं, असं आवाहन त्यांनी केलं. सरकार
नवीन भारताच्या निर्मितीसाठी
कटिबद्ध असून, नवीन भारत सुशिक्षित भारत असावा असं त्यांनी सांगितलं.
****
आरोग्य
ही उत्तम जीवनाची गुरुकिल्ली असून, आयुर्वेद ही पर्यायी उपचार पद्धतींपैकी एक आहे, असं
केंद्रीय आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे. गोव्यात
आयोजित केलेल्या आयुर्वेदीय मज्जा संस्था उपचार शिबिरात ते बोलत होते. आयुर्वेदाचा
जीवनपद्धती विषयक दृष्टीकोन व्यापक असून, शरीर आणि मनाचा समतोल राखण्यावर त्याचा
भर असतो असं ते म्हणाले.
****
पुढील
निवडणुकांसाठी केवळ १३ महिन्यांचा कालावधी उरला असून, मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिकन पक्षाला
दिलेल्या राज्यमंत्री पदाच्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केली आहे. हे राज्यमंत्रीपद, रिपाइं चे
राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर
आणि प्रदेशाध्यक्ष मुकेश धुलकर यांना सहा महिन्यांसाठी
विभागून देण्यात यावं, अशी शिफारस आपण करणार असल्याचही ते म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या
संगमनेर तालुक्यातल्या माहुली गावाजवळ एक चारचाकी गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळल्याची
घटना आज सकाळी घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना
उपचारासाठी आळे फाटा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त गाडीतले
प्रवासी पुण्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
****
सामान्य माणसाचं
हित लक्षात घेऊन शासन अनेक योजना राबवत असून, या योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत
पोहोचवत आहोत, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्याच्या
वाळवा तालुक्यातल्या देवर्डे इथं ग्रामपंचायत इमारत आणि विविध विकास कामांच्या उद्घाटन
प्रसंगी ते बोलत होते. नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळणं गरजेचं आहे, यासाठी छोट्या
मोठ्या वाड्यावस्त्यांवरही पेयजल पाणीपुरवठा योजनांसाठी भरीव निधी दिला जात आहे, असं
त्यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment