आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
९ सप्टेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला, बैलपोळ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. काल ठिकठिकाणच्या जलाशयांमध्ये शेतकऱ्यांनी
आपल्या बैलजोड्या धुवून खांदेमळणीचा दिवस साजरा केला. पोळा सण साजरा करण्यासाठी, आवश्यक
साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. आज पोळ्यानिमित्त,
बैलजोड्या सजवून मिरवण्याचा आणि बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्याचा प्रघात आहे.
****
देशभरातल्या दोन हजार ९९२ जिल्हा
आणि उपजिल्हा न्यायालयांमध्ये, भारत संचार निगम लिमिटेड - बी एस एन एल 'वॅन' अर्थात
'वाईड एरिया नेटवर्क' हे
संगणकीय महाजाल उभारणार आहे. विधी विभागानं या वॅन प्रकल्पासाठी एकशे सदुसष्ठ कोटी रुपयांची तरतूद केली असून, ई- न्यायालय अभियान प्रकल्पाच्या दुसऱ्या
टप्प्याचा, हा वॅन प्रकल्प महत्त्वाचा भाग आहे. हा
प्रकल्प या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.
****
झपाट्यानं विकास होत असलेल्या सेवा क्षेत्राचा
समावेश कौशल्य विकास योजनांमध्ये करुन त्यासाठी राज्यात लॉजिस्टिक पार्क
उभारण्याची योजना आहे, आणि या पार्कसाठी औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड राखीव
ठेवण्यात आला असल्याची माहिती, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. तरूणांना विविध
क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, उद्योग
विभागानं बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा, नवी मुंबईत वाशी इथं काल आयोजित
केला होता, त्यावेळी ते बोलत होते. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी २९ सप्टेंबरला
नाशिक, सहा ऑक्टोबरला कोल्हापूर आणि २० ऑक्टोबरला
मुंबई उपनगरात, रोजगार मेळावे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
पुण्याच्या नागरी विकास संघातर्फे दिला
जाणारा मराठवाडा भूषण पुरस्कार हिंगोलीचे विधान परीषदेचे आमदार रामराव वडकुते यांना
जाहीर झाला आहे. राजकीय क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा
मुक्तिसंग्राम दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
****
औरंगाबाद इथं काल झालेल्या लोक अदालतीत प्रलंबित
विविध ८०४ प्रकरणात तडजोड करण्यात आली तर २ कोटी १७ लाख ८४ हजार रुपयांहून अधिक रक्कम
वसूल करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच जिल्हा आणि सत्र न्यायालयातर्फे
या अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment