आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ नोव्हेंबर डिसेंबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
आज जागतिक एड्स दिवस पाळला जात आहे. एड्स विरुद्ध
संघटीत होऊन लढणं, एचआयव्ही पीडितांसोबत योग्य व्यवहार करण्यासंबंधी जनजागृती निर्माण
करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाची संकल्पना - know your status अशी आहे.
****
औरंगाबाद इथं जागतिक एड्स दिनानिमित्त आज सकाळी जनजागृती
रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रांती चौक इथून या रॅलीला सुरुवात झाली, तर मराठवाडा
सांस्कृतीक मंडळ इथं रॅलीचा समारोप झाला. एड्स नियंत्रण दिन आणि सप्ताहाच्या निमित्तानं
आजच तालुका स्तरावरही रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
स्वयंपाकाच्या लिक्विफाईड पेट्रोलियम
गॅस सिलिंडर्सच्या दरात कपात करण्यात आली असल्याचं इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीनं काल
जाहीर केलं. अनुदानित गॅस सिलेंडर्स सहा रुपयांनी तर विना अनुदानित गॅस सिलिंडर्स १३३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. काल मध्यरात्रीपासून
हे नवे दर लागू झाले आहेत.
****
राज्यातल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी
पदवी या सारख्या अभ्यासक्रमांसाठी होणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा या
वर्षी ऑनलाईन होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाईन होत होती.
दरम्यान, वैद्यकीय आणि दंतचिकित्सा अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट या परीक्षेच्या नोंदणीसाठीची मुदत येत्या सात डिसेंबरपर्यंत
वाढवण्यात आली आहे. काल ही मुदत संपणार होती.
****
भारतीय जनता पक्षाशी बंडखोरी करत लोकसंग्रामच्या
माध्यमातून धुळे महापालिका निवडणुकीत उतरलेले आमदार अनिल गोटे यांनी आपल्या उमेदवारांना
’शिट्टी’ हे सामाईक चिन्ह मिळावं, यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावली. लोकसंग्राम पक्ष आणि इतर ६९ उमेदवारांनी निवडणूक
निर्णय अधिकाऱ्याकडे ’शिट्टी’ हे एकच चिन्ह मिळावं, अशी विनंती केली होती, मात्र अधिकाऱ्यांनी
सोडत पद्धतीनं चिन्हाचं वाटप केलं, त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती.
*****
***
No comments:
Post a Comment