Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याची
मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Ø निळवंडे सिंचन योजनेसाठी साईबाबा संस्थानकडून पाचशे कोटी
रुपये बिनव्याजी कर्ज
Ø मराठवाड्यातल्या धरणांमध्ये सध्या २२ टक्के पाणीसाठा
शिल्लक
Ø राज्य सरकारचं आर्थिक व्यवस्थापन बिघडलं - खासदार
अशोक चव्हाण यांची टीका
आणि
Ø यंदाचा पुलोत्सव सन्मान, प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले
यांना जाहीर
****
अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून आदिवासी तसंच
दुर्गम भागातल्या शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याची
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल नाशिक
जिल्ह्यात सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी इथं, अटल
ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय उपचाराचा खर्च सामान्य माणसाला परवडत नसल्यामुळे
रोगनिदान झाल्यावरही अनेक जण उपचार घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घेता, राज्य शासनानं गरजू
रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चिय केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं. अशा प्रकारचं हे २७वं आरोग्य शिबीर असून, या शिबीरात सर्व वैद्यकीय
व्यावसायिक सेवाभावी वृत्तीनं सेवा देत असल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
****
देशात वैद्यकीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र
सरकार एक व्यापक धोरण तयार करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश
प्रभू यांनी म्हटलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. जगातल्या विविध
भागातून भारतात येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारची मदत पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध
असल्याचं ते म्हणाले. या रुग्णांसाठी देशात स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार
उपलब्ध असतील, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली.
****
राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी
नागरिकांना पिण्याचं पाणी, जनावरांना चारा पाणी, आणि मागेल त्याच्या हाताला काम देता
यावं, यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात टंचाई आढावा बैठकीत
ते काल बोलत होते. राज्यातली दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनानं केंद्र
शासनाकडे सात हजार ५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या
८७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून, त्यांना मदत मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याची
टंचाई भासू नये, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिकांची
स्थिती चिंताजनक असून कृषी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात
आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे सिंचन योजनेसाठी शिर्डी
इथलं साईबाबा संस्थान पाचशे कोटी रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहे. गोदावरी मराठवाडा
सिंचन विकास महामंडळ आणि साईबाबा संस्थान यांच्यात या बाबत करार करण्यात आला असून,
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर, अकोले, राहता, राहुरी आणि कोपरगाव तसंच नाशिक जिल्ह्यातल्या
सिन्नर तालुक्याला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या धरणासाठी गेल्या जून महिन्यात केंद्र
सरकारकडून प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दोन हजार २३२ कोटी रुपये निधी मिळाला
आहे.
****
मराठवाड्यात एकूण ८६७ धरणांमध्ये फक्त २२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद, जालन्यासह बीड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून इथं चारशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी धरणात २७ टक्के, येलदरी नऊ, पैनगंगा धरणात ५५ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात
२२ टक्के तर मांजरा आणि माजलगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
****
राज्य
सरकारचं आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडलं असून भाजप - शिवसेना
सरकारच्या काळात राज्य कर्जबाजारी झालं आहे, अशी
टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. आर्थिक नियोजन
नसल्यानं गेल्या
चार वर्षातच विद्यमान सरकारनं
राज्यावर पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा केला असल्याचं, चव्हाण यांनी काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात
म्हटलं आहे.
दरम्यान, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं सुरु केलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला उद्या
यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब इथून सुरुवात होणार असून, येत्या
९ तारखेला
बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं या यात्रेचा समारोप होणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी
दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
यंदाचा पुलोत्सव सन्मान, प्रसिद्ध अभिनेते विक्रम
गोखले यांना जाहीर झाला आहे. रत्नागिरीत येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पुलोत्सवात
गोखले यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. या तीन दिवसीय पुलोत्सवात, पु. ल. देशपांडे
यांच्यावरचा अपरिचित पु.लं. हा कार्यक्रम सतीश आळेकर, चंद्रकांत काळे आणि गिरीश कुलकर्णी
सादर करतील, पुलंनी रूपांतरित केलेलं एक झुंज वाऱ्याशी हे नाटक, पुलकित रेषा हे पुलंसंदर्भातल्या
व्यंगचित्रांचं प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा जळगाव
जिल्ह्यातले भाजपचे माजी खासदार डॉ गुणवंतराव सरोदे यांचं काल जळगाव इथं निधन झालं,
ते ७८ वर्षांचे होते. सरोदे यांनी १९९१ आणि १९९६ असं दोन वेळा जळगाव लोकसभा मतदार संघाचं
नेतृत्व केलं होतं. काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
बुलडाणा जिल्ह्यात एचआयव्ही एड्सच्या रुग्णांचं प्रमाण
शून्य पूर्णांक ३३ शतांश टक्क्यांवरुन शून्य पूर्णांक १७ शतांश टक्क्यांवर आलं आहे.
गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात एड्सचे १३९ रुग्ण सापडले आहेत. यंदा जागतिक एड्स प्रतिबंधक
दिनाच्या अनुषंगानं जिल्ह्यात ‘नो युअर एचआयव्ही स्टेटस’वर भर देण्यात येत असून, यामध्ये
विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि लोकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात
येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
****
मराठा समाज बांधवांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी
लातूर इथं मदतकेंद्र सुरु करण्याचा निर्णय, लातूर मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे.
काल लातूर इथं मराठा क्रांती भवनात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र
शासन तसंच विरोधी पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला. आरक्षणाच्या
लढ्यादरम्यान मृत झालेल्या तरुणांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेच्या
जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यात डिजीटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. नांदेड
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. काल रविवारी
काकडे यांच्या हस्ते, या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं.
जिल्ह्यातल्या सुमारे दीडशे गावात हे अभियान राबवलं जाणार आहे.
याअंतर्गत ग्राम पंचायत,
शाळा, अंगणवाडीसह महिला बचत गटांना स्वच्छते विषयक माहितीपट दाखवण्यात येणार आहे. शाश्वत
स्वच्छता, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, मैला-गाळ व्यवस्थापन, गटार मुक्त - शोषखड्डेयुक्त
गाव या माहितीचा यात समावेश आहे.
****
पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत-बेल्जियम
यांच्यात काल झालेला सामना बरोबरीत सुटला. ओडीसाची राजधानी भुवनेश्वर इथं झालेल्या,
क गटातल्या या सामन्यात, बलाढ्य बेल्जियम समोर भारत पहिल्या सत्रात एक - शून्यनं पिछाडीवर
होता. नंतर मात्र चुरशीच्या या सामन्यात भारतानं दमदार खेळ करत, सामना दोन दोन अशा
बरोबरीत संपवला. सध्या क गटात भारत गुणतालिकेत सर्वोच्च स्थानावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment