Thursday, 8 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०८ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती आजही कायम आहे.

 भीमा नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पंढरपूर शहरातही पुराचं पाणी शिरलं असून, शहरातल्या सुमारे अठराशे कुटुंबांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

 गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा, पामुलगौतम तसंच इंद्रावती नद्यांना पूर आला असून, भामरागड गावात पाणी शिरलं आहे.

 सांगली इथं जिल्हा कारागृहात पाणी शिरल्यामुळे सुमारे चारशे कैदी कारागृहाच्या इमारतीवर अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम आज सकाळी सुरू झालं.

 दरम्यान, जिल्ह्यातल्या पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे आज दुपारी पाहणी करणार आहेत, त्यानंतर ते सांगली इथं आढावा बैठक घेणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून, कोयना धरणाचे दरवाजे १३ फुटावर स्थिर करण्यात आले आहेत.

औरंगाबादच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. धरणाचा पाणीसाठा ६५ टक्क्यांहून अधिक झाला असून सध्या सुमारे एकतीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

 मराठवाड्यासह राज्यात काल अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. औरंगाबाद तसंच परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरु आहे.
****

 राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातल्या शासकीय इमारतींसाठी जलपुनर्भरण सक्तीचं करण्याचे निर्देश, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत बोलत होते. यामुळे, उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****

 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करण्यात येणाऱ्या ८३ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमध्ये लातूर तालुक्यातल्या मौजे शिराळा इथल्या पाच गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...