Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०९ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** जम्मू-काश्मीर
आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
** कोयना आणि
राधानगरी धरणातून सोडण्यात येणार पाणी कमी करण्यात आलं; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या
पूर स्थितीत सुधारणा
** सांगली जिल्ह्यात
नाव उलटून ९ जणांचा मृत्यू
** आणि
** विधानसभा
निवडणुकीत, काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नाही - वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट
प्रकाश आंबेडकर
****
जम्मू-काश्मीर
आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त
केलं. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगत
जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गातला अडथळा दूर झाल्याचं ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये
सर्वोत्तम पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे. चित्रपट सृष्टीनं तसंच अन्य कंपन्यांनी
काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा, तंत्रज्ञानामुळे काश्मिरी जनतेचं जीवन
अधिक सुसह्य होईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. काश्मीरमधली परिस्थिती सुरळीत
झाल्यानंतर पुन्हा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असंही त्यांनी
यावेळी स्पष्ट केलं. नव्या व्यवस्थेत पोलिसांसह राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य
राज्यांसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर काश्मीर आणि लडाखमधली
सर्व रिक्तपदं भरण्याची प्रक्रिया तत्काळ सुरु केली जाईल, यामुळे युवकांना रोजगार मिळेल,
असं ते म्हणाले.
****
पश्चिम महाराष्ट्रातल्या
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर स्थितीत सुधारणा होत आहे. काल सातारा जिल्ह्यातल्या
कोयना धरणातून सोडण्यात येणार पाणी कमी करण्यात आलं, तसंच राधानगरी धरणाच्या पाणलोट
क्षेत्रातला पाऊस कमी झाल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे कोल्हापूर
शहरातला पूर काहीसा कमी झाला. सांगली जिल्ह्यातही पूरामध्ये काही प्रमाणात घट झाली
आहे. जिल्ह्यातल्या चार तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला असून ३५ हजारांपेक्षा जास्त
लोक या संकटाचा सामना करत आहेत. जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात बचाव कार्य करणारी नाव
काल सकाळी उलटून ९ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण बेपत्ता आहेत. ब्रह्मनाळ इथून तीस लोकांना घेऊन खटावकडे जाणारी ही नाव झाडाला
अडकून उलटल्यानं ही दुर्घटना घडली.
पुरामुळे मृत्यूमुखी
पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर, सांगली तसंच सातारा जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीची
पाहणी केल्यानंतर ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार छत्रपती संभाजीराजे,
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंजाब, ओडिसा, गुजरातमधून आपत्ती प्रतिसाद
दलाची अनेक पथकं पूरग्रस्त भागात दाखल झाली आहेत. बचाव कार्यासाठीच्या बोटी वाढवण्यात
आल्या असून, आवश्यकता भासल्यास, हवाई मार्गानं नागरिकांच्या बचावाची तयारी शासनाची
आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा
करून, अलमाट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत त्यांना सूचना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. त्यानुसार अलमाट्टी धरणातून पाच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
केला जाणार आहे. पडझड झालेली घरं, तसंच अन्नधान्यासाठी सरकार मदत करणार असून, नागरिकांनी
घाबरून न जाता, धीर राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
राज्यात उद्भवलेली
पूरस्थिती अभूतपूर्व असून, आपत्ती निवारणात प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडल्याची टीका,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. काल पुण्यात ते वार्ताहरांशी
बोलत होते. पूरग्रस्त भागात शंभर टक्के कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
सामाजिक तसंच स्वयंसेवी संघटनांनी पूरग्रस्तांना सहकार्य करण्याचं आवाहन पवार यांनी
केलं. पूरग्रस्तांना सहकार्य म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी
एका महिन्याचं वेतन देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात
सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे येळगाव आणि करडी धरण शंभर टक्के भरलं आहे. पैनगंगा
नदी दुथडी भरून वाहत आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या पाच गावाचा संपर्क तुटला आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या
हतनूर धरणाचे सर्व एक्केचाळीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून सध्या सुमारे
दीड लाख दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत असून, जिल्हा प्रशासनानं
तापी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या
गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातलं
मुळा धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या अकरा दरवाजांमधून काल नदी पात्रात पाणी सोडण्यात
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातलं
जायकवाडी धरण ६८ टक्क्यांहून अधिक भरलं आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून आवक सुरु असल्यामुळे
पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, मराठवाड्यात लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
अद्याप चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. औरंगाबाद, हिगोली, जालना परभणी जिल्ह्यांमध्ये
काल दिवसभर रिमझिम पाऊस होता, तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
****
हवामान : येत्या
दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा
आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण अणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी
मुसळधार पाऊस पडेल, तर पश्चिम किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशाराही विभागानं
दिला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत
केलं जात आहे.
****
आगामी विधानसभा
निवडणुकीत, काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता नाही असं वंचित बहुजन आघाडीचे नेते
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत
होते. काँग्रेसनं आमच्या पक्षावर भारतीय जनता पक्षाची ‘ब’ संघ असल्याचा आरोप केल्यामुळे
त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य लढा
भाजपशी आहे, आणि काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी
सांगितलं. एमआयएमसोबतच ही निवडणूक लढली जाईल, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा
निवडणुकीसाठी एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं औरंगाबादचे
खासदार इम्तियाज जलील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या ८० जागांवर सर्व
जाती धर्मातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल, असं ते म्हणाले.
औरंगाबादहून
विविध ठिकाणांसाठी विमानसेवेसाठी आणि रेल्वे संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी केंद्र
सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाडा विभागात
आजपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबादचे महसूल
उपायुक्त सतीश खडके यांनी दिली आहे. कृत्रिम पावसासंबंधी शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची
कार्यशाळा औरंगाबाद इथं काल घेण्यात आली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यासंबंधीचं
डॉप्लर रडार विभागीय आयुक्त कार्यालयात बसवण्यात आलं असून सी-१९ हे विमानही दाखल झालं
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पूरपरिस्थितीमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी
मुदतवाढ द्या अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या परिक्षांसाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली होती, मात्र अजुनही काही ठिकाणी पूरपरिस्थिती कायम असल्यामुळे आणखी मुदतवाढ
द्यावी असं चव्हाण यांनी निवेदनाद्वारे म्हटलं आहे.
****
कॉंग्रेस पक्षाच्या
नगरसेवकासंदर्भातल्या केलेल्या एका वक्तव्यावरुन नांदेड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण
सभेत काल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. या
गदारोळामुळे महापौर दीक्षा धाबले यांनी भाजपचे नगरसेवक दीपक रावत यांना एक दिवसासाठी
निलंबित केले. या निर्णयाविरुद्ध भाजपनं सभागृहात
निदर्शनं केली.
****
स्थानिक स्वराज्य
संस्थांमधल्या मागास प्रवर्ग- ओबीसीचं आरक्षण पूर्ववत ठेवावं या मागणीसाठी, अखिल भारतीय
महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ
बागडे यांच्या घरासमोर आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी बागडे यांची भेट घेऊन त्यांना
यासंदर्भातलं निवेदन दिलं.
***
भारत आणि वेस्ट
इंडिज यांच्यातला पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द करण्यात
आला.
***
No comments:
Post a Comment