Saturday, 10 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१० ऑगस्ट  २०१९  सकाळी ७.१० मि.
****

Ø  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातून अडीच लाख नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर
Ø   बेरोजगारी आणि उद्योग क्षेत्रातल्या मंदीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरकारवर टीका
Ø  सहासष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; श्रीनिवास पोफळे ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
Ø  मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी सूक्ष्म सिंचनाकरता अतिरिक्त ३३७ कोटी रुपये मंजूर
आणि
Ø  कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कालपासून सुरूवात
****

 कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, सैन्यदल, नौदल, तटरक्षक दल युद्धपातळीवर बचाव कार्य करत असल्याचं, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****

 सांगली जिल्ह्यात पुराची पाणी पातळी कमी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. पूरजन्य परि‍‍स्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यात ७६ बोटी उपलब्ध आहेत, सध्या सांगलीवाडी परिसरात अन्नाची सुमारे तीन हजार पाकिटे हेलिकॉप्टर आणि बोटीव्दारे पोहोचवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शहरासाठी जवळपास पाच हजार अन्न पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या बोटीव्दारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
****

 नंदुरबार जिल्ह्यातही पूरस्थिती गंभीर होत असून, शहादा, अक्कलकुवा आदी गावातल्या दोनशेहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक नद्या, नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातली राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

 धुळे शहरात पावसामुळे कालही शाळा बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातून इतर गावी जाणाऱ्या बस गाड्यांच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातले नऊ मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
****

 अमरावती जिल्ह्यात सतत झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं प्रमुख राज्यमार्ग बंद आहेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दर्यापूर तालुक्यातल्या सांगोला इथं जलसंधारण विभागाची शेततळी फुटून शेतीचं मोठं नुकसान झालं. मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं तापी आणि गडा नदीवरील पूलं पाण्याखाली गेली आहेत, पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकं पोहोचली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

 दरम्यान, महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची आणखी ८३ पथक पाठवली असल्याचं, केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. या आधीपासून बचाव कार्यात कार्यरत असलेल्या १७३ पथकांसोबत ही ८३ पथकं काम करतील.
****

 बेरोजगारी आणि उद्योग क्षेत्रातल्या मंदीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. काल मुंबईत पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना, राज ठाकरे यांनी, देशासमोरच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी, कलम ३७०, राम मंदीर, समान नागरी कायदा, असे मुद्दे समोर आणले जात असल्याची टीका केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे देशातल्या ३७१ मतदार संघात मतांचा घोळ झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही तुकडे पाडले जातील, अशी शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. 
****

 सहासष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. नाळ या चित्रपटातला बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर झाला असून, नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कारही नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना जाहीर झाला. मराठी चित्रपटांमधून भोंगा हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून, तर अंधाधुन हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे.

 हेलारो या गुजराथी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. अभिनेते आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला तर तेलगू अभिनेत्री कीर्ती सुरेश हिनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. उरी या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, तर पद्मावत चित्रपटानं संगीत आणि नृत्य दिग्दर्शनाचे पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार बिंदू मनी यांना, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार अरिजीत सिंह यांना तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला. किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारही जाहीर झाला असून, बधाई हो चित्रपटातल्या भूमिकेसाठी सुरेखा सिकरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
****

 चले जाव चळवळीच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त काल सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव केला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या नऊ स्वातंत्र्य सैनिकांना गौरवण्यात आलं. 
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी सूक्ष्म सिंचनाकरता अतिरिक्त ३३७ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. ते काल बुलडाणा इथं बोलत होते. हा निधी तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलं असून, या योजनेच्या पूर्व संमतीचा ३० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील नव्यानं अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचं, डॉ बोंडे यांनी सांगितलं.
****

 जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून काल बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात आलं. जायकवाडी धरणात सध्या जवळपास पंचाहत्तर टक्के पाणीसाठा झाला असून, एकतीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं धरणात सध्या पाण्याची आवक सुरू आहे. 
****

 मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कालपासून सुरूवात झाली. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातल्या डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाकडून वैमानिक आणि शास्त्रज्ञांना ढगांचं छायाचित्र पाठवण्यात आलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास हे विमान आकाशात झेपावल्याची माहिती या मोहिमेचे संचालक कान्हुराज बगाटे यांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागात हा प्रयोग केला जाणार असल्याचं, बगाटे यांनी सांगितलं.
****

 विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या शिक्षकांना वेतन सुरू करण्यात यावं, या मागणीसाठी जालना जिल्ह्यात विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं काल रस्ता बंद आंदोलन करण्यात आलं. १५ ऑगस्टपर्यंत वेतनाच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलक शिक्षकांनी प्रशासनाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 लातूर जिल्ह्यातून दोन बोटी आणि इतर साहित्यासह अग्निशमन आणि पोलिस विभागाचे कर्मचारी काल सांगलीकडे रवाना झाले.

दरम्यान, लातूर शहरातले नागरिकही कपडे, औषधी आणि अन्नधान्याच्या रुपात मदत संकलित करत आहेत, असं सामाजिक कार्यकर्ते डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरातूनही पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात येत आहे.

 अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून २३ डॉक्टरांसह एक वैद्यकीय पथक काल कोल्हापूरसाठी रवाना झालं. सोलापूर जिल्ह्यातूनही सहा वैद्यकीय पथकं रवाना झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे. नांदेडच्या श्री गुरूद्वारा सचखंड मंडळातर्फे कपडे, औषधं तसंच डॉक्टर असलेल्या दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तिथे लंगर सुरू ठेवणार असल्याचं या सचखंड मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
****

 उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क आयोगानं बाल हक्क संरक्षण विषयक जनसुनावणी घेतली. १५० तक्रारींवर यावेळी सुनावणी झाली. बालकांचं अत्याचार, हिंसाचारापासून संरक्षण करून त्यांचं मनोधैर्य राखण्याचं काम बाल हक्क आयोग करत असल्याचं, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी यावेळी सांगितलं.
****

 जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १४० गावांमध्ये पाणी आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. ही पथकं काल नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली.
****

 कृषी क्षेत्र आणि सौर ऊर्जा या विषयावर औरंगाबाद इथं दोन दिवसीय परिषद घेण्यात आली. या परिषदेत, सौर उर्जा भविष्यात कृषि क्षेत्रासाठी फायद्याची ठरू शकते का?' या विषयावर दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेनं तयार केलेल्या "सिल्व्हर बुलेट' या अहवालाचं काल प्रकाशन करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव या सौरपंपांचा सर्वाधिक वापर करणाऱ्या गावाला परिषदेत सहभागी मान्यवरांनी भेट दिली. काल झालेल्या दोन चर्चासत्रांमधून मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेडचे नगराध्यक्ष मुजीव अहमद अन्सारी यांच्यासह एकाला काल तीन लाख बारा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. कंत्राटदाराच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी अन्सारी यानं लाच मागितली होती. 
****

 नांदेड - पनवेल - नांदेड एक्सप्रेस रेल्वेगाडी पुणे ते पनवेल दरम्यान १२ ऑगस्ट पर्यंत अंशत: रद्द करण्यात आली आहे. मुंबई, पुणे परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...