आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
कोल्हापूर आणि सांगली
जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात
आलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, सैन्यदल, नौदल, तटरक्षक दल युद्धपातळीवर
बचाव कार्य करत असल्याचं, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना
सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आज सातारा,सांगली
आणि कोल्हापूर इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळं
२१ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं केलेल्या पंचनाम्यात
ही स्थिती आढळली असून हा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, पूरग्रस्तांना बाराशे क्विंटल धान्य वाटप करण्यात येणार असल्याची
माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
****
सांगली जिल्ह्यात पुराची पाणी पातळी कमी होत असल्याची
माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी
जिल्ह्यात ७६ बोटी उपलब्ध आहेत, सध्या सांगलीवाडी परिसरात अन्नाची सुमारे तीन हजार
पाकिटे हेलिकॉप्टर आणि बोटीव्दारे पोहोचवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त शहरासाठी जवळपास
पाच हजार अन्न पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या बोटीव्दारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात
येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली
जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना तातडीची मदत पुरवण्यासाठी राज्य सरकारनं १५४ कोटीं रुपयांचा
मदतनिधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत केला आहे. तसंच पूरग्रस्त भागातला वीजपुरवठा
सुरळीत करण्यासाठी ४० पथकं काम करत आहेत.
****
दरम्यान सांगली इथं बचावकार्य सुरु असताना, काल सायंकाळी
जवानांची एक बोट बुडाली. पाण्याचा प्रवाह जास्त
असल्यामुळं ही घटना घडली असुन,बोटीतील सर्व जवानांना वाचवण्यात आलं असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा
पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोदावरीमधील पाण्याच्या पातळीमध्ये पुन्हा वाढ
होण्यास सुरुवात झाली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment