Sunday, 11 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११  ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मदत वेळेत पोहोचावी, यासाठी मदत साहित्य रेल्वेद्वारे मोफत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्‍तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणं आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचं हे पत्र राज्यातल्या सर्व रेल्वे विभागांना प्राप्त झाल्याचं रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी सांगितलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलमट्टी धरणातून पाच लाख ३० हजार घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले असून, त्यामधून चार हजार २५६ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे. तर कोयना धरणामधून ५३ हजार ८८२ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली.
दरम्यान कोल्हापूर इथल्या पंचगंगेच्या पातळीत चांगली घट झाल्याने पाणी ओसरू लागले आहे. आज एकूण २४९ गावांमधून सुमारे ५१ हजार कुटुंबातल्या २ लाख ४५ हजार २२९ नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
****
श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आज सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले होते. काही दिवसांपासून चंद्रभागा नदीला पूर आल्यानं शहरातले दोन्ही मुख्य पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांचा ओघ मंदावला होता. मात्र दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून एकादशीचा योग साधण्यासाठी भाविकांनी आज पंढरपुरात एकच गर्दी केली.
चंद्रभागा नदीच्या पात्रातील पुराचं पाणी ओसरलं असलं, तरी पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं अद्याप पाण्यातच आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेत पोलीस प्रशासनानं नदीलगतच्या घाटांवर आणि मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.
****
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा आणि समर्पण भावनेचा संदेश देतो. हा सण साजरा करताना दानधर्म, तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केला जातो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी औषधी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. या आगीमुळे हजारो रूपयांची औषधी व गोळ्या  जळून खाक झाल्या आहेत. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात सौंदलगाव पाटी गावाजवळ ही घटना घडली.
****
राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना हजारो गावांमध्ये यशस्वी झाल्याचा दावा सरकार करत आहे. मग मराठवाड्यातल्या गावांना वॉटर ग्रीडची गरज उरते का, असा प्रश्न जलतज्ञ प्रा. प्रदिप पुरंदरे यांनी विचारला आहे. जालना शहरात आज झालेल्या  मराठवाडास्‍तरीय  मराठवाडा ‍वॉटरग्रीड परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्याची भौगोलिक स्थिती आणि सध्याच्या वातावरण बदलामुळे पावसाचं कमी झालेलं असताना पाण्याचं नियोजन कसं करणार, असंही ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात नव्या व्यापारी  संकुलाचं उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झालं. यावेळी सेलू नगर परिषदेतर्फे अध्यक्ष विनोद बोराडे यांनी मदतीचा २ लाखांचा धनादेश लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला.
****
हैद्राबाद इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय विजेता सौरभ वर्माचा सामना सिंगापुरच्या लो किन यू विरुध्द होणार आहे. तर महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीची लढत कोरियाच्या बेक हा ना आणि जुंग युन या जोडीशी होणार आहे.
****
औरंगाबादची बॅडमिंटन पटू मिताली कुलकर्णी हिची सतरा वर्षाखालील अखिल भारतीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...