Sunday, 13 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 13.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                                  Language Marathi           

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

** शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचा इशारा

** पन्नास हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एस.एस शेटकार विरूद्ध गुन्हा दाखल

आणि

** श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी भारताच्या सहा बाद ३२९ धावा

****

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. नाशिक औद्योगिक वसाहतीतली जमीन विनासूचित करुन खासगी विकासकाला दिल्याचे आरोप विरोधकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नसल्याचं देसाई यांनी सांगितलं. यासंदर्भात होणाऱ्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असून या चौकशीनंतर येणारे निष्कर्ष मान्य करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना देसाई यांच्या पाठीशी आहे असं म्हटलं आहे. विरोधी पक्षांकडून मात्र या मुद्यावर देसाई यांच्यासह सरकारच्या भूमिकेवर टीका होत आहे. 

सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, ‘डॅमेज कंट्रोल’साठी देसाई यांनी राजीनाम्याचं नाटक केल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शिवसेना पूर्वीपासूनच भ्रष्टाचाराचे समर्थन करत असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमीच त्याकडे डोळेझाक करतात, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

देसाई यांचा राजीनामा न स्वीकारून, सरकारने नैतिकता धाब्यावर बसवली असल्याचं, स्पष्ट झालं, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय ही सरकारची भूमिका ही राजकीय संधीसाधूपणाची असल्याचंही सावंत म्हणाले.

देसाई यांचा राजीनामा फेटाळून मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांचंही मंत्रिपद वाचवलं, अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांनी केली आहे. दोन्ही मंत्री पदावर असताना, नि:पक्ष चौकशी होऊ शकणार नाही, त्यामुळे दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊनच चौकशी करावी, असं मुंडे म्हणाले. भ्रष्टाचारी मंत्री आणि सरकार विरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

****

राज्‍यात न्‍यायालयांच्‍या इमारतींमध्‍ये आवश्‍यक त्‍या सुविधा पुरवण्‍यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुणे कौटुंबिक न्यायालयाच्‍या नूतन इमारतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्‍ते, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. एकत्र कुटुंब पध्‍दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, बदलत्‍या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचं प्रमाण वाढत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

पुढील वर्षापासून नव्या हज धोरणानुसार हज यात्रेचे आयोजन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. ते काल मुंबईत हज यात्रेच्या आढावा बैठकीला संबोधित करत होते. नवीन हज धोरण २०१८ ची घोषणा चालू महिन्यातच केली जाणार असून हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक बनवणं, हा या धोरणाचा उद्देश्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या धोरणात हज यात्रेकरूंना सागरी मार्गाने पाठवण्याचा पर्याय समाविष्ट आहे. यामुळे हजयात्रेचा खर्च निम्म्याने कमी होईल असं सांगून हे धोरण आखण्यासाठी स्थापन, उच्चस्तरीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं दिला आहे. मुंबईत काल सुकाणू समिती सदस्य आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथदादा पाटील यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सरकारनं जाहीर केलेल्या निकषांसह कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. समितीच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार न केल्यानं राज्यव्यापी आंदोलन केल जात असल्याचं, यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या आंदोलनाचा भाग म्हणून, उद्या १४ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा तर परवा १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिला आहे.

****

मराठवाड्याच्या जल विकासासाठी पाण्याचा योग्य वापर आणि जल व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन जलतज्ञ प्राध्यापक प्रदीप पुरंदरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल  स्वामी रामानंद तीर्थ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात गोदावरी खोरे जल आराखडा आणि मराठवाडा या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सिंचन क्षेत्रात अधुनिक तंत्रज्ञानासह प्रकल्पांचं जल व्यवस्थापन- कारभार- नियमन महत्वाचं असून मराठवाड्यातील पाण्यासाठी नगर-नाशिक कडून भांडून पाणी मिळवणं हा एकच पर्याय नाही असही ते म्हणाले. पाटबंधारे विकास मंडळ हा जल विकासातला अडसर असल्याचं सांगून यासाठी स्वायत्त जलसंपत्ती  नियामक मंडळाची गरज असल्याचं  पुरंदरे यांनी नमूद केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

येत्या दोन वर्षात जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला विजेचा शाश्वत पुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल जालना इथं पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि  एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत प्रस्तावित ३३ किलोव्हॅट क्षमतेच्या केंद्राचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांसाठी वीज या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी १२४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वीज देयकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या थकबाकीपैकी दंड तसंच व्याज वगळून, मूळ रकमेचा भरणा करण्याचं आवाहनही ऊर्जा मंत्र्यांनी केलं.

****

लातूर इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एस.एस शेटकार यांच्या विरूद्ध पन्नास हजार रुपये लाच मागितल्याप्रक्रणी गुन्हा दाखल झाला आहे. लातूर परिवहन कार्यालयातल्या एका निरीक्षकाच्या विरोधात आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी शेटकार यांनी ही लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं औसा रोडवर एका मोटार ड्रायव्हिंग केंद्रात शेटकार यांच्यासह त्यांच्या साथीदाराला लाच स्वीकारताना काल रंगेहाथ पकडलं. मात्र शेटकार फरार झाले. प्रत्यक्ष लाच घेणारा छोटू गडकरी याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या मंडळ अधिकारी कार्यालयातला लेखनिक नारायण देडे याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. जातीच्या दाखल्यांसाठीच्या  चौकशी अहवालावर मंडळ अधिकाऱ्याची सही घेऊन देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी देडे यानं केली होती.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारताच्या सहा बाद ३२९ धावा झाल्या. शिखर धवननं ११९, लोकेश राहुलनं ८५, कर्णधार विराट कोहलीनं ४२ तर रविचंद्रन अश्विन ३१ धावा केल्या. कालच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा रिद्धिमान सहा तेरा तर हार्दिक पांड्या एका धावेवर खेळत होते. या सामन्याचं धावतं वर्णन सकाळी साडे नऊवाजेपासून आकाशवाणीवरून ऐकता येणार आहे.

****

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त उद्या सोमवारी लातूर इथल्या १५० हून अधिक रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार तर सहा जण जखमी झाले. खुलताबादहून भद्रा मारोतीचं दर्शन घेऊन दुचाकीवर परत येत असतांना  पडेगाव इथल्या छावणी परिषदेच्या टोल नाक्याजवळ एका लष्करी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्याण एका महिलेचा मृत्यु झाला तर त्या महिलेचा पती आणि तीन वर्षांची मुलगी जखमी झाली.

दुसरा अपघातही खुलताबादहून भद्रा मारूतीचं दर्शन घेऊन जाणाऱ्या दुचाकीला पाथ्री गावाजवळ झाला. यात दुचाकीवरच्या एका तरूणाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला.

फुलंब्रीजवळ भालगाव फाटा इथ टेंपो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्य झाला.

मुंबई - नागपूर एक्सप्रेसवेवर आसेगाव शिवारात भरधाव वेगानं जाणाऱ्या कंटेनरनं एका मोटारीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात मोटारतल्या एक जणाचा मृत्यु झाला.तर तीन जण जखमी झाले.

****

बीड जिल्ह्यातल्या प्रलंबित विकास कामांसाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करत असल्याचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पाटोदा तालुक्यात सावरगाव - घाट या राष्ट्र संत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळी आयोजित भगवानबाबा जन्मोत्सव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या गावाचा समावेश तीर्थ क्षेत्र विकासामध्ये झाल्याचं सांगून गावासह भगवानबाबा यांचा जन्म झालेल्या वाड्याचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****








No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...