Tuesday, 15 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 15 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाला बलशाली करण्यासाठी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, प्रदूषणापासून मुक्ती, भ्रष्टाचारापासून मुक्ती, करजंजाळ मुक्ती, अस्वच्छतेपासून मुक्ती, बिल्डरांच्या मनमानीपासून मुक्ती अशा ‘सप्तमुक्ती’चा संकल्प केला पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.
भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयातल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी आज ते बोलत होते.
येत्या ५ वर्षात प्रत्येक नागरिकाला नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावयाचं आहे. सव्वाशे कोटी भारतीयांनी हाच संकल्प केल्यास आपण जगातली महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य शासनानं शेतकऱ्यांना सक्षम करण्यास प्राधान्य दिलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता कर्जमाफी जाहीर केली असून, एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन शेती क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना शासनानं केल्या आहेत. तसंच विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांनी संकल्पबद्ध होत प्रयत्न केला तर येत्या ५ वर्षामध्ये बलशाली महाराष्ट्र आणि बलशाली भारत निर्माण होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी न्यायमूर्ती एस एस शिंदे, न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला, न्यायमूर्ती आर व्ही घुगे यांच्यासह जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विधीज्ञ आर एम देशमुख आणि संघाचे पदाधिकारी तसंच नागरिक उपस्थित होते.

****

देशामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावत असताना, नोकरी नसल्यामुळं पदवीधर बेकार फिरत आहेत. दुसरीकडे प्रशिक्षित पदवीधर मिळत नाहीत म्हणून उद्योजक अडचणीत येत आहेत. यावर उपाय म्हणून कौशल्य विकास अभियानात विद्यार्थी रोजगाराभिमुख होतीलच याकडं लक्ष देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी केलं. एकहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. संवादातून सर्व प्रश्न सुटतात, यासाठी नियमितपणे संवाद होणं गरजेचं असल्याचं औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर बी.ए.चोपडे यांनी सांगितलं.

****

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. स्वच्छता अभियानात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचं सांगतानाच, लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातले परतूर, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर हे चार तालुके उघड्यावर शौचापासून पूर्णपणे मुक्त झाले असल्याचं सांगितलं. संगणकीकृत सातबारा वाटपाला यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. लोकप्रतिनिधी, तसंच सर्वसामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात खोतकर यांनी राज्यशासनाच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

मे २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिक्षण विभागानं रद्द केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. शिक्षण विभागानं ज्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू करुन त्यांचं वेतन पुन्हा सुरु करण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयामुळे मुंबईसह राज्यातल्या माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमधल्या सुमारे सात हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

****

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या जीवघेण्या ब्लू व्हेल गेम बाबतच्या सर्व लिंक काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारनं गुगल,फेसबूक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, मायक्रोसॉफट आणि याहूसह इतर कंपन्यांना दिले आहेत. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून गेमची लिंक तातडीनं हटविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं संबंधित कंपन्यांना पत्र पाठविलं आहे. याविषयीच्या सूचना कायदा आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या होत्या.ब्लू व्हेल गेमच्या टास्कमुळं भारतासह विविध देशांमध्ये मुलांनी आत्महत्या केल्या असल्याच्या घटना घडल्यामुळं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...