Thursday, 17 August 2017

Text-AIR News Bulletin HLB , Aurangabad 17.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१७ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

पारशी नववर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज साजऱ्या होत असलेल्या पतेती या पारशी नववर्षारंभानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आणि आधुनिक भारत घडवण्यासाठी पारसी समाजाचं मोठं योगदान असल्याचं राष्ट्रपती आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.  राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारशी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यातल्या पर्यटनस्थळांची पर्यटकांना सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशानं पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं व्हिजीट महाराष्ट्र ही योजना राबवण्यात येत आहे. याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संकेतचिन्हाचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं.

****

राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठातल्या विविध विद्याशाखांच्या पी एच डी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक परिक्षेचा निकाल काल जाहीर झाला. कृषी परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी ए ई आर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असं कृषी विद्यापीठ परिक्षा मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

शासनानं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया  २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. १६ ऑगस्ट पर्यंत  १२ लाख ३८ हजार  शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकुण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात येत असल्याचं ते म्हणाले.

****

आकाशवाणीचे ज्येष्ठ तबला वादक भाऊसाहेब दीक्षित यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात काल दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. उंबरखेडा इथं काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.

****

सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी लावून देण्यासाठी पाच हजार रूपये लाच स्वीकारतांना एकास काल परभणी इथं रंगेहाथ अटक करण्यात आली. भीमराव पुंडगे असं याचं नाव असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...