Thursday, 14 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 14.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.

****

मुंबई - अहमदाबाद या देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनमुळे विकासाचा वेग वाढणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदी यांनी आज अहमदाबाद इथं या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन केलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते. भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून, अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं हे एक पाऊल टाकण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले. बुलेट ट्रेनमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेची भरभराट झाली, तशीच भारताचीही होईल, अशी आशा शिंजो आबे यांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे देशात मोठं परिवर्तन होणार असल्याचं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. ८८ लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, तो ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

****

देशभरात आज हिंदी दिवस साजरा करण्यात येत आहे. १९४९ साली आजच्या दिवशी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं वर्ष २०१६-१७ चे राजभाषा पुरस्कार प्रदान करणयात आले. विविध विभाग, मंत्रालय, कार्यालय प्रमुखांना उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हिंदी दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.



हिंदी राजभाषा दिनानिमित्त आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रामध्ये आजपासून ‘राजभाषा हिंदी पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातले प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेंडगे यांच्या हस्ते या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. हिंदी भाषा राष्ट्रीय एकतेचं सूत्र मांडत असल्याचं शेंडगे यावेळी म्हणाले. या पंधरवड्यादरम्यान कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

उत्तर प्रदेशातल्या बागपत जिल्ह्यात यमुना नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी काळा गाव जवळ हा अपघात झाला. १५ जण पोहून किनाऱ्यावर आले, तर दहा जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

****

नवीन जीएसटी कराद्वारे अवास्तव नफेखोरी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यासाठी सरकारनं चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत केंद्र आणि राज सरकारी कर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तक्रारीत तथ्य आढळल्यास ती पुढील चौकशीसाठी नागरी हितसंबंध संरक्षक संचालनालयाकडे पाठवण्यात येणार आहे. जीएसटीमुळे कमी झालेल्या कराचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी ही नफेखोरी विरोधातली यंत्रणा उभारण्यात आली आहे.

****

रेल्वे प्रवासी आता प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून एम आधार या सुविधेचा उपयोग करु शकतील. एम आधार हे एक मोबाईल ॲप असून, त्याद्वारे नागरिकांना आपलं आधार कार्ड डाऊनलोड करता येईल. मात्र त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार नंबरला जोडणं आवश्यक असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या स्वयंसेवी संस्थांना, परदेशातून मिळालेला निधी ज्या बँक खात्यात जमा होतो, ती खाती प्रमाणित करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक संस्थानी बँक खात्याचं प्रमाणिकरण न केल्यानं बँकांना परराष्ट्र निधी अधिनियमातल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेनं विचार करावा, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सरकारी तेल कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत प्रधान यांनी, किमतीत सुधारणा करण्याची ही प्रक्रिया सुरु राहील, असं सांगितलं.

****

औरंगाबादच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या पाच हजार ६९० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करणारा तेरणा प्रकल्पही ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातले निम्न खैरी, हातोला प्रकल्पही पूर्ण क्षमतेनं भरले आहेत.

लातूर जिल्ह्यातही तावरजा प्रकल्पासह १३ बंधारे शंभर टक्के भरले असून, मांजरा प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

****

राष्ट्रीय लोकअदालतीच्या उपक्रमात विक्रमी प्रकरणं निकालात काढून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं बाजी मारली आहे. मोटार अपघात प्रकरणं आणि जमीनीचे भूसंपादक केल्यापोटी शेतकऱ्यांना मावेजा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणं तडजोड करण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. यावेळी ६९१ प्रकरणं निकाली काढण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 8 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...