Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 SEP. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून चीन
आणि म्यानमार या दोन देशांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना होणार आहेत. पंतप्रधान मोदी
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी चीनमधल्या झीयान शहरात होणाऱ्या ९ व्या ब्रीक्स शिखर परिषदेला
हजर राहणार आहेत. या परिषदेत सदस्य राष्ट्र जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करणार
असल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत म्हटलं
आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या दरम्यानच्या चर्चेबाबत
अद्याप काहीही ठरलं नसल्याचं ते म्हणाले.
****
भारताच्या काळ्या पैशाविरोधातल्या लढाईसाठी
संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्याबाबत प्रतिबद्ध असल्याचं स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा
डोरिस लुथार्ड यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या परराष्ट्र संबंधाला ७० वर्षे
पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीमध्ये स्वित्झर्लंड दूतावासात आयोजित कार्यक्रमात त्या
बोलत होत्या. लुथार्ड या चार दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. भारत हा स्वित्झर्लंडचा चांगला
मित्र असून गेल्या सात दशकांमध्ये दोघांनीही एकमेकांना सल्ले दिले असून दोघेही एकमेकांपासून
अनेक गोष्टी शिकले असल्याचं लुथार्ड म्हणाल्या. दौऱ्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यासोबत चर्चा करून अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य
करण्याचे मान्य केलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमधल्या पंथा
चौकात दहशतवाद्यांनी पोलीसांवर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला आहे तर अन्य
सात जखमी झाले आहेत. काल रात्री सशस्त्र पोलीसांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानं
ही दुर्घटना घडल्याचं पोलीसांनी सांगितलं. कृषण लाल असं शहीद पोलीस जवानाचं नाव असून,
पाकिस्तानस्थित लष्कर ए तय्यबानं या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
आहे. सुरक्षा जवानांनी या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे.
दरम्यान, कुलगाम मध्ये सुरक्षा जवान आणि
दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. ही चकमक अद्यापही सुरू असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वीडनची संरक्षण क्षेत्रातली उत्पादक
कंपनी ‘साब’ आणि अडाणी उद्योगसमूहानं संरक्षण क्षेत्रात उत्पादन करण्यासाठी एकत्रितरित्या
काम करण्याचं जाहीर केलं आहे. दोन्ही कंपन्यांच्या वतीनं काल नवी दिल्लीमध्ये याबाबत
घोषणा करण्यात आली. दोन्ही कंपन्या अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करणार असून प्रामुख्यानं
भारतीय हवाई दलासाठीच्या एकेरी यंत्राची युद्धविमानं तयार करण्यासाठीचे करार मिळवण्याचं
त्यांचं उद्दिष्ट आहे. मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय हवाई दलासाठीच्या ग्रीपेन या युद्धविमानांची
निर्मिती करण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत.
****
आगामी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसह अन्य
स्पर्धांमध्ये भारताच्या तयारीची रुपरेषा आखण्यासाठी क्रीडा मंत्रालयानं १३ सदस्यांची
समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक कृतीदलानं आपल्या अहवालात अशा प्रकारची
समिती स्थापन करण्याची शिफारस केली होती. ही समिती राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा
तसंच ऑलिम्पिक खेळांसाठी खेळाडूंच्या प्राथमिकता काय असतील, याचा अभ्यास करणार आहे.
****
आगामी गोव्यात होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचं काम माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं राष्ट्रीय चित्रपट
विकास महामंडळ - एन एफ डी सीकडे सोपवलं आहे. मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केल्याचं
मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. चित्रपट महोत्सव संचालनालय यापूर्वी हा महोत्सव
आयोजित करत होतं.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय
मेहता यांनी डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या
मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात उघड्या ड्रेनेज मध्ये पडून डॉ. अमरापूरकर
यांचा मृत्यू झाला. नंतर वरळी इथल्या तटरक्षक कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह सापडला.
१५ दिवसांच्या आत या चौकशीचा अहवाल मेहता यांनी मागवला आहे. अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर
महानगरपालिकेवर सर्व स्तरातून टिका होत आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेचा २६२ तुकड्यांचा
घोटाळ्यातली सहा कोटी ५८ लाख एवढी रक्कम दोषींकडून वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. हा घोटाळा उघड करणारे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विठ्ठल
भोसले यांनी २०१३ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी तत्कालीन पाच शिक्षणाधिकारी,
१३ वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांसह ९९ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापक
अशा एकूण ३१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बोगस विद्यार्थी दाखवून वाढीव तुकड्या
घेण्यात आल्या, त्यावर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या, तसंच शासनाचं अनुदान लाटल्याचं
तपासात समोर आलं आहे.
****
No comments:
Post a Comment