Friday, 15 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

स्वच्छता राखण्याची जबाबदारी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांची नव्हे तर आपणा सगळ्यांची जबाबदारी असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा उत्तर प्रदेशात कानपूर इथं राष्ट्रपतींच्या हस्ते आज शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. अस्वच्छता हा समाजासाठी अभिशाप असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला या अभियानाचा समारोप होणार आहे.
मुंबई इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. आपण सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प करु या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
औरंगाबाद इथं जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
नांदेड इथंही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, तर बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह, नगराध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. विभागात सर्वत्र या अभियानाला आजपासून प्रारंभ झाला

****

महाराष्ट्र मिशन - एक मिलीयन या फुटबॉल खेळ महोत्सवाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं प्रारंभ केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील ‘विश्वचषक फुटबॉल स्पर्धे’च्या वातावरण निर्मितीसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातले विद्यार्थी आज फुटबॉल खेळून यात सहभागी झाले.  
औरंगाबाद इथं विभागीय क्रीडा संकुलावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ झाला. अनेक शाळांचे सुमारे पाच हजारांवर विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते.
लातूर शहरात यानिमित्त विद्यार्थ्यांची संदेशफेरी काढण्यात आली. शिक्षणाधिकारी नजीर शेख यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. जिल्हा क्रीडा संकुलावर शालेय विद्यार्थ्यांच्या ४० संघात फुटबॉलचे सामने घेतले जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी फुटबॉल मिशन रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. आजचा फुटबॉल महोत्सव ही सर्वात मोठी क्रीडा मोहिम ठरत असल्याचं डोंगरे म्हणाले. जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर, हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे, बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी या मोहिमेला सुरूवात झाली.

****

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन परवा १७ सप्टेंबरला साजरा होत असून, औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभाजवळ सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे.

****

राज्य सरकारांनी तुरुंगांमध्ये कैद्यांसाठी विशेष करुन पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या कैद्यांच्या समुपदेशनासाठी सल्लागार आणि मदतनिसांची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशातल्या तुरुंगांमध्ये सुधारणा करण्यासाठी न्यायालयानं आज दिशा निर्देश जारी केले. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी मृत कैंद्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन स्वत: जनहित याचिका दाखल करा, आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची घोषणा करा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशभरातल्या एक हजार ३८२ तुरुंगांमधल्या अमानुष परिस्थितीबद्दल दाखल जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले.

****

राज्यात आजही अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून संततधार सुरु असून, रेल्वेसेवा काही काळ विस्कळीत झाली होती. औरंगाबाद शहर आणि परिसरात आज दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. सखल भागात तसंच अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं, वाहनधारकांची तारांबळ उडाली. परभणी आणि नांदेड शहरातही आज पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

वाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या भगवती, तपोवन, कण्हेरगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतल्या कामगारांना वेळेवर वेतन देण्यासाठी ‘राष्ट्रीय निधी व्यवस्थापन प्रणाली’ची सुरुवात केली आहे. जवळजवळ ९६ टक्के वेतन कामगारांच्या थेट खात्यात जमा होत असल्याचं ग्रामीण विकास मंत्रालयानं सांगितलं.

****

कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात सिंधूनं जपानच्या मिनात्सू मितानीचा १९-२१, २१-१६, २१-१० असा पराभव केला. मात्र समीर वर्माला पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व सामन्यात कोरियाच्या सेन वेन होन कडून पराभव पत्करावा लागला.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...