Thursday, 14 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 14.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

हिंदी भाषा संपूर्ण जगाला एका सूत्रात बांधून ठेऊ शकते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. हिंदी दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राजभाषा पुरस्कार आज राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. डॉक्टरांनी औषधांची नावं हिंदीतून लिहून दिली, तर रुग्णांना त्याचं लवकर आकलन होईल, असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यावेळी बोलताना, देशातल्या नागरिकांची संपर्क भाषा हिंदी असल्यानं तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तसंच सरकारी कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, असं नमूद केलं.  

****

भारत आणि जपाननं गुंतवणूक प्रोत्साहन, विमान वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञानासह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात १५ समांजस्य करार केले. गुजरातमधल्या गांधीनगर इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.
तत्पूर्वी दोन्ही नेत्यांनी मुंबई - अहमनदाबाद या देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन केलं.
दरम्यान, या बुलेट ट्रेनला मुंबईत बोईसर इथल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी संभाव्य भू संपादनाच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांनी आज बोईसर रेल्वे स्थानकाबाहेर काळे झेंडे फडकावत, घोषणाबाजी केली.

****

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवण्याचं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं तावडे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या एक आणि दोन जुलै २०१६ रोजी घोषित केलेल्या अनुदानास पात्र शाळांना तत्काळ अनुदान द्यावं, तसंच औरंगाबाद इथल्या लाठीहल्ला प्रकरणी दाखल केलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथल्या कांद्याच्या दोन व्यापाऱ्यांवर आज आयकर विभागानं छापे टाकले, व्यापाऱ्यांचं घर, कार्यालय तसंच कांद्याच्या खळ्याची तपासणी करण्यात येत आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड, येवला, पिंपळगाव बसवंत, सटाणा, उमराने, इथल्या व्यापाऱ्यांवर देखील आयकर विभागानं छापे टाकले. या कारवाईमुळे आज लासलगाव इथल्या बाजार समितीत कांद्याचा बाजार ठप्प झाला होता.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षात घ्यायचं की नाही, याचा निर्णय राज्यातल्या भाजप नेत्यांनी घ्यावा, असं मत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक इथं आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय जीएसटी व्यापारी परिषदेनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये व्यापाऱ्यांच्या सोयीचे बदल केले जातील, असंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं.

****

जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज मागच्या सभेत अर्थसंकल्पात सुचवलेले बदल विषय पत्रिकेत घेण्याच्या मागणीवरुन गोंधळ झाला. विरोधी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहातच विषयपत्रिका फाडून फेकल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी सभा आटोपती घेत गोंधळातच सर्व विषय मंजूर झाल्याचं जाहीर केलं. सभेनंतर भाजप सदस्यांनी अध्यक्षांना घेराव घातला.

****

लातूर इथं एका शेतात लोंबकाळणाऱ्या वीजेच्या तारेचा धक्का लागून तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्यानं नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह आज सकाळी महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवला. महावितरणच्या वतीनं तातडीची मदत दिल्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन अंत्यविधी केला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे परंडा तालुक्यातला चांदणी प्रकल्प ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात आज काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. औरंगाबाद शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे.

****

नवी मुंबईत होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलियन हा कार्यक्रम राज्यभरात राबवला जात आहे. यामध्ये फुटबॉल खेळाच्या माध्यमातून खेळातून आरोग्य विकास हे ध्येय नजरेसमोर ठेवल्याची माहिती शालेय क्रीडा आणि शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली. याअंतर्गत उद्या राज्यभरात १० लाख मुलं फुटबॉल खेळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि समीर वर्मा उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. पी कश्यपचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला. उपान्त्य फेरीच्या सामन्यात सिंधूचा सामना जपानच्या मिनात्सू मितानी विरुद्ध, तर समीरचा सामना कोरियाच्या सेन वेन होन विरुद्ध होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 8 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...