Friday, 15 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 15.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

जम्मू काश्मीरमधल्या अरनिया सेक्टरमध्ये सीमारेषेवर आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक सीमा सुरक्षा बलाचा जवान शहीद झाला. पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जवानांच्या चौक्या आणि रहीवाशी भागांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. कॉन्स्टेबल विजेंद्र बहादूर असं शहीद जवानाचं नाव असून, ते उत्तर प्रदेशातले रहीवाशी होते. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. पहाटेनंतर बराच वेळ ही चकमक सुरु होती.

****

हरियाणा सरकार गुरुग्राम इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा ताबा घेण्याची शक्यता असल्याचं हरियाणा शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव के के खंडेलवाल यांनी सांगितलं. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी अनेक त्रुटी आढळून आल्या असून, यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

भारतरत्न एम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस आज अभियंता दिन म्हणून साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशातल्या अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विकासात अभियंत्यांची भुमिका महत्वाची असून, त्यांचं कार्य उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

दरम्यान, पंतप्रधान येत्या २४ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

तेलंगणा सरकारनं राज्यातल्या जमिनींची नोंदणी ठेवण्यासाठी आजपासून एक व्यापक सर्वेक्षण सुरु केलं आहे. देशात अशा प्रकारचं हे पहिलंच सर्वेक्षण होत आहे. या सर्वेक्षणात राज्यातल्या सर्व दहा हजार ७३३ महसूल मंडळांना समाविष्ट करण्यात आलं आहे. यामुळे जमिनीची खरेदी विक्री, नोंदणी, मालकी हक्क आणि जमिनींशी संबंधीत अन्य व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

****

भारतात पुढच्या महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी राज्यात आज एकाच दिवशी दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. आज सकाळी मुंबईत जिमखाना इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "महाराष्ट्र मिशन एक -मिलीयन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचं उदघाटन झालं.

राज्यात इतरत्रही शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

****

२९ ऑगस्टला मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी उत्कृष्टपणे कर्तव्य बजावलेल्या पोलिसांना बक्षिस म्हणून राज्य सरकारनं पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आणि ईद दरम्यानही शांतता आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही ही भेट देण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं काम मुंबई पोलिसांनी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात मुंबईसह अनेक जिल्हयात आज पाऊस सुरु आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

नांदेड शहरातही सकाळापासून मुसळधार पाऊस सुरु  असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी आणि गंगाखेड इथं पोलिसांनी महसूल कर्मचाऱ्यांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. महसूल कर्मचारी संघटनेनं ही घोषणा केली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी चोकशी अहवाल सादर केल्यामुळे आणि दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा अहवाल तयार केल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी मेहकरी या रस्त्यावर बस सेवा बंद करण्यात आली आहे. शिरापुर रस्ता खराब झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर बस सेवा बंद आहे. यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांची शाळा बंद असूने, लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करुन बस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...