Tuesday, 17 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७  एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 औरंगाबाद शहरात गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचराकोंडी आणि कचरा व्यवस्थापनात महापालिकेला आलेलं अपयश, याचा निषेध करण्यासाठी आज औरंगाबाद कनेक्ट टीम या सर्वसामान्य नागरिकांच्या संघटनेनं औरंगाबाद महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. पैठण दरवाजापासून निघालेला हा मोर्चा टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौक मार्गे महापालिकेवर धडकला. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आलं. शहरातला कचरा प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचं आश्वासन महापौरांनी यावेळी दिलं. या गारबेज वॉकमध्ये सुमारे दोन हजारावर नागरिक सहभागी झाले होते.

****

 अहमदनगर इथल्या पोलिस अधीक्षक कार्यालात तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. केडगाव दुहेरी हत्याकांडातल्या आरोपींना सोडण्याची मागणी करत त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली होती. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही याच आरोपावरुन अटक करण्यात आली आहे.

****

 जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून गोदावरी नदीपात्रात काल एक हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. गोदावरी नदीवरच्या आपेगाव आणि हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमधे हे पाणी साठवलं जाणार आहे. त्यामुळे जवळपास १८ गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार आहे.

****

 सामाजिक प्रसार माध्यम व्हॉट्स ॲप वरुन महिला कर्मचाऱ्याला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह दोघांविरुद्ध शहरातल्या आनंदनगर पोलीस ठाण्यात काल विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

 जालना जिल्ह्यातील काही भागात काल गारपीट झाली. तालुक्यातल्या विरेगाव शिवाराला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला, त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांब वाकल्यानं वीजपुरवठा विस्कळीत झाला. गारपिटीमुळे आंबा, मोसंबीसह भाजीपाला, फळबागा आणि शेडनेटचं नुकसान झालं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...