Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशभरात
पुरेशा प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं
आहे. गेल्या काही आठवड्यांत महाराष्ट्रासह काही राज्यात चलन तुटवडा जाणवत असल्याचे अहवाल
प्रसारमाध्यांमध्ये जाहीर झाले, त्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी आज चलन परिस्थितीचा आढावा घेतला. अचानक मागणी वाढल्यानं काही भागात तात्पुरता तुटवडा निर्माण झाला असेल तर तो
त्वरित आटोक्यात आणला जाईल, असं त्यांनी ट्वीटरवरून
सांगितलं आहे.
****
कृषीपंपधारकांनी पैसे भरूनही प्रलंबित
असणाऱ्या कृषिपंपाच्या उर्जीकरणासाठी, उच्चदाब वितरण प्रणाली योजनेच्या अंमलबजावणीला
राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे, आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी
दिलेल्या आणि जुलै २०१६ च्या निर्णयानुसार मुल्यांकनात पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त
खाजगी प्राथमिक तसंच माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला
आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर नागरी क्षेत्रात
उड्डाणपूल आदीच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होऊनही,
निधीअभावी रखडलेल्या भूसंपादनासाठी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून
निधी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या
कलम १६६ (४) आणि कलम ७३ क ब (१५) मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याच्या निर्णयालाही
मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
केंद्र सरकारच्या वतीनं पंतप्रधान
एलपीजी पंचायतचं आयोजन करण्यात येत असून, या योजनेअंतर्गत सात प्रवर्गात मोडणाऱ्या
कुटुंबांना अवघ्या शंभर रूपयात घरगुती वापराची गॅसजोडणी देण्यात येणार आहे. हिंदुस्थान
पेट्रोलियमचे सहाय्यक विक्री अधिकारी कौशल खंडेलवाल यांनी आज लातूर इथं ही माहिती दिली.
येत्या २० एप्रिल रोजी देशात उज्ज्वला दिवस साजरा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन कार्यरत असून, लोकसहभागातून विविध योजना राबवत असल्याचं विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
इथं आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित एक दिवसीय
ग्राम परिवर्तन प्रकल्प कार्यशाळेत ते बोलत होते. गावांमधलं आरोग्य, शिक्षण,
शेती, व्यवसाय आणि गुणवत्तापूर्ण
पायाभूत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत
आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २० गावांची निवड करण्यात
आली आहे.
****
मानवी विकास निर्देशांक वाढीसाठी प्रत्येक बालकाला दर्जेदार
प्राथमिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे, असं लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके
यांनी म्हटलं आहे. उदगीर इथं आयोजित तालुकानिहाय निर्धार सभेत ते आज बोलत होते. शाळेची
गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
संपूर्ण कृषी कर्जमाफी, तसंच मराठवाड्यासाठी एक लाख घरकुलं,
आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला. शेतमालाला किफायतशीर भाव, बोंडअळीची नुकसान भरपाई, खरिपासाठी
पाणी नियोजन आदी मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य
सूर्यकांत मोहरीर यांचं आज अंबाजोगाई इथं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. भारतीय शिक्षण
प्रसारक संस्थेचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष, परळीच्या वैद्यनाथ देवस्थानचे
संचालक आदी पदांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. मोहरीर यांच्या निधनानं समाजाच्या
सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
****
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्यासंबंधीच्या
कायद्याला राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपालांची मंजुरी
मिळाल्यानंतर आता नियमावली तयार केली जाणार असून, त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी
होणार आहे.
****
अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय
तोडफोड प्रकरणात नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण
विभागाकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले कैलास गिरवले यांचा काल रात्री
पुण्यात मृत्यू झाला. दरम्यान, गिरवले यांच्या मृत्यूस पोलीस कारणीभूत असल्याचा आरोप
गिरवले यांच्या पत्नीनं केला आहेण
****
उस्मानाबाद शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
झाला. लातूर इथंही पाच वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यात
केज परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, मराठवाड्यात आज औरंगाबाद आणि परभणी इथं सरासरी
४० आणि उस्मानाबाद इथं ३७ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन
दिवस मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment