Wednesday, 18 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

****

कठुआ लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आठ वर्षीय पीडित बालिकेची ओळख उघड करणाऱ्या वृत्तसंस्थांना, दिल्ली उच्च न्यायालयानं, दहा लाख रुपये दंड ठोठावला आहे. पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल, या वृत्तसंस्थांनी न्यायालयाची माफी मागितली. या वृत्तसंस्थांनी, एका आठवड्याच्या आत, जम्मू काश्मीरच्या पीडित भरपाई निधीमध्ये प्रत्येकी दहा लाख रुपये जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमधल्या, पीडित व्यक्तींची ओळख जाहीर करण्यावर, प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याबाबत, व्यापक आणि सतत जागृती करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

वित्तमंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीनं, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना, येत्या सतरा मे पूर्वी समितीसमोर हजर होण्यास सांगितलं आहे. देशात उघडकीला आलेले बँक घोटाळे, तसंच बँकेची कर्ज वसूल करण्यासंबंधीच्या समस्यांची, माहिती देण्यासाठी, समितीनं, पटेल यांना हजर होण्याचे आदेश दिले. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एम.वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं, आर्थिक सेवा सचिव राजीव कुमार यांच्याकडून, काल, बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्द्यांबाबत माहिती घेतली आहे.

****

कर्नाटकात बेळगाव इथं, पोलिसांनी सुमारे पाच कोटी रुपये मूल्याच्या, बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बेळगाव शहराच्या रहिवासी भागातल्या एका घरातून, काल मध्यरात्रीनंतर हा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पाचशे आणि दोन हजार रुपये दर्शनी मूल्याच्या या बनावट नोटा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदारांना, प्रलोभन म्हणून वाटण्यासाठी आणल्या असल्याची शक्यता, वर्तवण्यात आली आहे.

****

पोषण अभियानाअंतर्गत देशापुढील पोषण आव्हानविषयक राष्ट्रीय परिषदेची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथं होत आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आंतरक्षेत्रीय कृती समन्वयातून देशातल्या पोषणविषयक आव्हानांसंदर्भात धोरणात्मक दिशा निश्चित करणं, हे या राष्ट्रीय परिषदेचं उद्दीष्ट आहे.

****

महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज बंगळुरु इथे बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्याआधी, लिंगायत महासभेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निषेधात्मक निदर्शनं केली आणि लिंगायत समाजाला अल्पसंख्यक हा दर्जा देण्याबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका शाह यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

****

आज सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या परशुराम जयंतीच्या औचित्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. परशुराम जयंतीनिमित्त सर्वत्र वाहनफेरी, शोभायात्रा इत्यादी कार्यक्रम होत आहेत.

****

यंदाच्या गळित हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकवल्याप्रकरणी राज्यातल्या पाच साखर कारखान्यांचं साखर, मळी बगॅस इत्यादी साहित्य जप्त करून त्यांची विक्री करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा, भोगावती आणि पंचगंगा तर सांगली जिल्ह्यातल्या महाकाली आणि माणगंगा कारखान्यांवर ही कारवाई होणार आहे. या पाच साखर कारखान्यांकडे मिळून सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांची देणी थकलेली आहे.

****

हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठीची विविध धोरणं असणारा राष्ट्रीय कृती कार्यक्रम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं तयार केला आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे तपशील सगळ्यांना पाहता येतील. या कृती कार्यक्रमाबाबतची मतं आणि सूचना येत्या सतरा मेपर्यंत संकेतस्थळावर नोंदवताही येतील.

****

पश्चिम बंगालमध्ये काल धडकलेल्या वादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाल्याचं तसंच अन्य पन्नास जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या स्थितीकडे लक्ष ठेवण्याचे तसंच झालेल्या मृत्यू आणि नुकसानाचे अहवाल तयार करण्याचे निर्देश त्या राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...