Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर सलग पाचव्या दिवशी
जम्मू आणि काश्मीरमधली परिस्थिती शांततापूर्ण आहे. नागरिकांनी काल काश्मीर खोऱ्यात
सुरक्षेच्या वातावरणामध्येच प्रार्थना केली.
दरम्यान, संयुक्त
कृती समिती कारगीलनं जाहीर केलेला बंद ईद सणा निमित्त तात्पुरता स्थगित करण्यात आला
आहे. जम्मू भागातल्या पाच जिल्ह्यांत परिस्थिती सामान्य होत आहे. त्यामुळे तिथं काल
फौजदारी दंड विधानाच्या १४४ अंतर्गत जमाव बंदीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. तसंच या भागांत आज पासून सर्व शैक्षणिक
संस्था सुरू करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये जमाव
बंदीची कारवाई कधी मागे घ्यायची त्याबाबतचा
निर्णय ईदनंतर घेण्यात येईल, असं जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे.
****
भारताच्या जम्मू आणि
काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयामुळं पाकिस्तान वैफल्यग्रस्त झाला असल्याचं
भारताचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल
नवी दिल्ली इथं बोलत होते. या घडामोडीमुळे पाकिस्तान विनाकारण दोन्ही देशांमधले संबंध
बिघडले असल्याचं चित्र निर्माण करत असल्याचंही कुमार यांनी म्हटलं आहे. त्या राज्यात
विकास झाला तर पाकिस्तान तिथल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करू शकत नसल्यानंच पाकिस्तान
असा वागत असल्याचं ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे सर्वोच्च हित डोळ्यासमोर ठेवूनच
हा निर्णय घेण्यात आला असल्याचंही कुमार म्हणाले.
****
दरम्यान, पाकिस्ताननं
औपचारिकरित्या भारतासोबतचे व्यापारी संबंध संपुष्टात आणले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान
इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा
समितीनं घेतलेल्या या निर्णयाला मान्यता देण्यात आली. अगोदरच पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही
देशांदरम्यानचे संबंध ताणलेले होते. त्यातच
भारतानं पाकिस्तानमधून आयात करण्यात येणाऱ्या मालावर २०० टक्के आयात कर बसवलेला होता,
त्यामुळे पाकिस्तानमधून होणारी आयात सुमारे ९२ टक्क्यांनी घटली होती.
****
भारताची
जम्मू-काश्मीरला
दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याची कृती भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतच असल्याचं, रशियाच्या परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयानं म्हटलं आहे. रशिया हा भारत आणि पाकिस्तान मधले संबंध सुदृढ करण्यासाठी नेहमीच तयार असतो. मात्र
दोन्ही देशांतील मतभेद द्विपक्षीय आधारावर सोडवले जावे असंही रशियानं स्पष्ट केलं आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन कायद्या
मधील दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यासंबंधी विधी आणि न्याय मंत्रालयानं काल एक अधिसूचना जारी केली. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या सत्रामध्ये
हे दुरुस्ती विधेयक पारित करण्यात आलं होतं. या विधेयकात सध्याच्या मोटार वाहन कायदा,
१९८८ मध्ये रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये
वाहतूक नियमांचा भंग केल्यास करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ
करण्यात आली आहे. अपघातातल्या पीडितांसाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्येही या
विधेयकात वाढ करण्यात आली आहे.
****
राहूल गांधी यांच्या जागी नव्या अध्यक्षाची निवड
करण्यासाठी काँग्रेस कार्यकारी समितीची आज नवी दिल्ली इथं बैठक होत आहे. माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका
गांधी वाड्रा, अहमद पटेल, पी चिदंबरमसह अनेक दिग्गज नेते या बैठकीला हजर आहेत. जेष्ठ
नेते शशी थरूर आणि करण सिंग यांनी नेतृत्वाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केल्यानंतर
या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पदासाठी मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य
शिंदे आणि सचिन पायलट यांची नावं आघाडीवर आहेत.
****
सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात बँकांची एटीएम मशीन, इंटरनेट सेवा, सर्व्हर बंद असल्यामुळं लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले
आहेत. दूध, भाजीपाला, अन्नधान्य सारख्या जीवनपयोगी वस्तुंची कमतरता जाणवत आहे. त्यामुळं
रोजचा खर्च भागवण्यासाठी सरकारनं जाहीर केलेली दहा हजार रुपयांची मदत तत्काळ मिळावी,
अशी मागणी पुरग्रस्त कुटुंबांकडुन केली जात आहे. मात्र,
पूर ओसरल्यावर संबधित घरांचे पंचनामे करुन ही मदत मिळणार असल्यानं, जनतेतून रोष व्यक्त
होत आहे.
*****
***
No comments:
Post a Comment