Sunday, 11 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
११ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा आज सकाळी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. गोदापात्रातून सध्या ६३ हजार घनफूट प्रतिसेकंद आवक सुरूच असल्यामुळे उजव्या कालव्यातून माजलगावकडे ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. आता जायकवाडीत एकूण २ हजार ४८५ दशलक्ष घनमीटर एवढा जिवंत पाणीसाठा असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****

 सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर  कमी  झाल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महापूर ओसरू लागला असून, दर तासाला एक इंच पाणी पातळी कमी होत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फूट ६ इंच इतकी आहे. अनेक उपनगरात अजूनही पाणी असलं, तरी विस्तारित भागात पाणी ओसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 रेल्वे मार्गावरील पुराचं पाणी ओसरल्यामुळे मिरज- पुणे, मिरज- बेळगांव रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारपासून एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अद्याप पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे तर आज पासून मिरज- सोलापूर रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
****

 मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकानं एक बेकायदा टेलीफोन एक्सचेंज नष्ट केलं असून, याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मस्जीद बंदर, डोंगरी, वरळी, गोवंडी, तसंच पनवेल, कल्याण भागात काल ही कारवाई करण्यात आली आहे. या टेलीफोन एक्सचेंजमुळे शासनाचा सुमारे ३७ कोटी रुपये महसूल बुडाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****

 भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेन च्या क्वीन्स पार्क ओवल मैदानावर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात सुरु होणाऱ्या या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीमधून प्रसारित केलं जाणार आहे.
*****
***

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...