Wednesday, 18 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –18 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
इलेक्ट्रॉनिक सिगारेटचं उत्पादन, आयात, वितरण आणि विक्रीवर केंद्रीय मंत्रिमंडळानं बंदी घातली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या बाबतच्या अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ई सिगारेट्सचा तरुणाईवर होणारे संभाव्य दुष्परिणाम पाहता हा निर्णय घेतल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. या नियमाचा भंग केल्यास पहिल्या वेळेस एक लाख रुपये दंड आणि एक वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं ७८ दिवसांचा पगार, दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. साडे अकरा लाखावर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
****
हिंदी भयपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम रामसे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. दरवाजा, पुराना मंदीर, वीराना, घुटन, बचाओ, नेबर्स या चित्रपटांसोबतच झी हॉरर शो, सॅटरडे सस्पेंस, एक्स झोन, नागीन, आदी दूरचित्रवाणी मालिकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.
****
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार  असल्याचं शासन निर्णयात नमूद आहे. मराठवाडा तसंच विदर्भातल्या पाच हजार १४२ गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
****
उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत वाढ करण्याची मागणी शिवसेनेनं केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. सध्या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत २८ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे, ही मर्यादा ७० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळानं केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान दिवाळीपूर्वी घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. पक्षप्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली. राज्यात निम्म्याहून अधिक लोक दिवाळीसाठी आपापल्या गावी जातात, त्या काळात निवडणूक घेतल्यास, मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो, असं मलिक म्हणाले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी निवडणूक आयोग काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नसल्याने, हा मुद्दा उपस्थित करण्यात काहीही अर्थ नव्हता, असं ते म्हणाले
****
आगामी निवडणुकीत तरूणांना मोठ्या प्रमाणावर संधी देत असून, ही तरूण मंडळींच राज्याला नवीन दिशा देण्याचं काम करतील असा विश्वास, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते आज बीड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. सध्या नेत्यांची पळापळ सुरू असली तरी, माझा सच्चा कार्यकर्ता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं, पवार यांनी सांगितलं. दुष्काळामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली असून सरकारला या बद्दल गांभीर्य नसल्याची टीका पवार यांनी केली. विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांनी यावेळी बीड जिल्ह्यातले काही उमेदवार जाहीर केले. बीड मतदार संघातून संदीप क्षीरसागर, केज-नमिता मुंदडा, परळी- धनंजय मुंडे, माजलगाव- प्रकाश सोळंके, आणि गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडीत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात बाळापूर इथं, एक लाख अठरा हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. बाळापूरकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली असता, विविध कंपन्यांचा गुटखा आढळला. या गुटख्यासह पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतलं असून, वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
विभागात आज बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बीड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार तर काही भागात रिमझीम पाऊस झाला. उस्मानाबाद इथंही जोरदार पाऊस झाला.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...