Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 November
2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - १९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा
तिढा अद्यापही कायम; काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक
** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला
प्रारंभ; नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते
फारुख अब्दुल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून विरोधी पक्षांच्या खासदारांची घोषणाबाजी
** अवकाळी
पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदारांची संसद परिसरात निदर्शनं
**
आणि
** उदगीरचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रामप्रसाद
लखोटिया यांना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार जाहीर
****
राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा तिढा अद्यापही कायम असून सत्ता
स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षांनी आपला स्वत:चा मार्ग निवडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
राज्य विधानसभेच्या निवडणुका शिवसेना- भाजप युती विरुद्ध काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस
आघाडी अशा लढल्या गेल्या, त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा, आम्ही आमचा राजकीय निर्णय
घेऊ, असं पवार यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
दरम्यान, पवार यांनी काल दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी
यांची भेट घेतली. बैठकीनंत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, राज्यातल्या राजकीय परिस्थितीची
सोनिया गांधी यांना माहिती दिली असून, सरकार स्थापनेबाबत मात्र आमच्यात चर्चा झाली
नाही, असं सांगितलं. आघाडीतल्या इतर पक्षांना नाराज न करता त्यांची मतंही विचारात घेऊन
पुढील निर्णय घेतला जाईल, असं पवार म्हणाले. या बैठकीत येत्या एक - दोन दिवसात पुढील
निर्णय घेण्याचं निश्चित झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी
ट्विटरवरुन दिली आहे.
पवार आणि गांधी यांच्यात अपेक्षित चर्चा न झाल्यामुळे शिवसेनेत
अस्वस्थता होती, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पवार यांची भेट
घेतली. या बैठकीत राजकीय नव्हे तर ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
झाली, असं बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. सोनिया गांधी आणि शरद
पवार हे मोठे नेते असून, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी त्यांना विचारु शकत नाही,
असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब
मलिक, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे नेते आज दिल्लीला जाऊन सत्ता
स्थापनेसंदर्भात चर्चा करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर एकही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्यामुळे
राज्यात गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे.
****
शिवसेनेनं, पक्षप्रमुख दिवंगत
बाळासाहेब ठाकरे यांचं
स्वप्न साकारण्यासाठी, काँग्रेस आघाडीऐवजी भारतीय जनता पक्षासोबतच सरकार स्थापन
करण्याचं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. भाजपला तीन वर्ष
तर शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं अशी आपली सूचना असून, त्याबाबत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला.
कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत विद्यमान तसंच माजी
सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी, सदनातले दिवंगत
सदस्य, अरुण जेटली, जगन्नाथ मिश्रा, राम जेठमलानी, गुरुदास दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल
श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली
अर्पण केली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल
काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, भारतीय रिपब्लीनकन पक्षाचे
राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत
खासदारांच्या आठवणीला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला. दुपारच्या सत्रात राज्यसभेच्या
२५०व्या बैठकीनिमित्तानं विशेष चर्चा घेण्यात आली.
लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील
यांच्यासह इतर नवनिर्वाचित खासदारांना काल पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या माजी सदस्य सुषमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत
सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून
श्रद्धांजली अर्पण केली.
नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावरील
कथित प्रतिबंधावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच
अध्यक्षांनी सदनाचं प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज सुरू ठेवलं.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी
मागणी औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केली आहे. ते काल लोकसभेत बोलत
होते. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरचं उभं पीक संपूर्णपणे नष्ट होऊन, शेतकरी
आर्थिक दृष्ट्या एकदम कमकुवत झाला आहे, या पार्श्वभूमीवर हेक्टरी आठ हजार रुपये ही
अत्यंत तोकडी मदत असल्याचं, जलील यांनी लोकसभेत नमूद केलं.
****
महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती
म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना खासदारांनी काल सकाळी संसद
परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, यांच्यासह शिवसेनेचे
सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते. या पावसामुळे राज्यातल्या
३६पैकी तीस जिल्ह्यात सुमारे सत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरचं पाच हजार कोटी रुपयाचं
उभं पीक नष्ट झाल्याचा अंदाज, सरकारी पत्रकातून वर्तवण्यात आला आहे
****
भारताचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती
शरद बोबडे यांनी काल पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात काल सकाळी राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेनं
किशोरी पेडणेकर यांना तर उपमहापौर पदासाठी सुहास वाडकर यांना उमेदवारी दिली आहे. पेडणेकर
यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षानं महापौर पदाची निवडणूक
लढवणार नसल्याचं, पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे जाहीर केलं.
दोन हजार बावीस साली होणारी मुंबई महापालिकेची
निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
परभणीत महापौर पदासाठी काल
काँग्रेसकडून अनिता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्षा खिल्लारे आणि गवळणबाई
रोडे, भाजपच्या मंगला मुद्गलकर यांनी, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे भगवान वाघमारे
आणि मेहबूब खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब
अली पाशा, अली खान, आणि भाजपचे मुकुंद खिल्लारे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
लातूर इथं महापौर-उपमहापौर पदासाठी काल एकही अर्ज दाखल
झाली नाही.
****
उदगीर इथले ज्येष्ठ समाजसेवक
डॉ. रामप्रसाद लखोटिया यांना यंदाचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय एकात्मता संस्थेचे सचिव
डॉ. शरद अदवंत यांनी काल औरंगाबाद इथं या पुरस्काराची घोषणा केली. कृष्ठरोग निर्मुलन,
कुटुंब नियोजन, अंधत्व, रक्तदान अशा विविध क्षेत्रात डॉ. लखोटिया यांनी उल्लेखनीय काम
केलं आहे. २१ हजार रुपये रोख, शाल, स्मृतिचन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथं
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं काल कापसाचे लिलाव सुरू करण्यात आले. कापसाला जास्तीत
जास्त चार हजार नऊशे पाच रुपये भाव देण्यात आला. सध्या कापूस ओला आणि कवडीयुक्त येत
आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कापूस वाळवून आणावा, असं आवाहन बाजार समितीचे
सभापती रविंद्र डासाळकर यांनी केलं आहे.
****
अवकाळी पावसामुळे नुकसान
झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात इस्लापूर
इथं काल भारतीय किसान सभेनं रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची
वाहतूक विस्कळीत झाली होती.
****
परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर नागरी सुविधा उपलब्ध
करून द्याव्यात या मागणीचं निवेदन महानगरपालिका प्रशासनाला वारंवार देऊनही त्यांनी
दखल न घेतल्यामुळे माजी खासदार सुरेश जाधव यांनी काल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर
ठिय्या आंदोलन केलं. याची तत्काळ दखल घेत आमदार सुरेश वरपुडकर यांनी प्रशासनाला या
समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्यातल्या खासगी अनुदानित शाळांना १२ टक्के वेतनेतर
अनुदान द्यावं, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य शिक्षण
संस्था महामंडळ या संघटनेनं दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या अडीच वर्षांपासून खासगी अनुदानित शाळांमधे
शिक्षक भरती झाली नसून, रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती करण्याची मागणीही त्यांनी यावेळी
केली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर
तालुक्यातल्या लिंबाळा गावातलं रोहित्र जळाल्यामुळे हे गाव गेल्या पंधरा दिवसांपासून
अंधारात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधूनही दखल घेतली
जात नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment