Tuesday, 19 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनीही त्यांना आज आदरांजली वाहिली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनीही इंदिरा गांधी यांना अभिवादन केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्हा प्रभारी म्हणूनही शिंदे यांची नियुक्ती केली आहे. तर,पक्षाच्या आघाड्या आणि विभागांसाठी राज्य समन्वयक म्हणून बसवराज पाटील नगराळकर यांची नियुक्ती पक्षानं केली आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा येत्या तीन ते तेवीस मार्च या कालावधीत तर बारावीची लेखी परीक्षा येत्या अठरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा आणि महाविद्यालयांना कळवलं जाईल, असं मंडळानं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
****
पावसाळा जास्त काळ राहिल्यानं राज्यात यावर्षी थंडी सुमारे पंधरा दिवस उशिरानं जाणवण्याला सुरुवात झाली आहे. अहमदनगर, नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात कालपासून थंडी जाणवत असल्याचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्यात शेतीची रबी हंगामाची कामं सुरू झाली असून, बियाणे महामंडळानं पुरेसं बियाणं उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात होणार असलेल्या सुनावणीसाठी राज्य शासनानं माजी महा न्यायवादी मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. हे पथक मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची बाजू मांडणार आहे.
****
पन्नासावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून गोवा इथं सुरू होत आहे. या महोत्सवात गाजलेल्या दिग्दर्शकांचे उत्तम चित्रपट दाखवले जाणार आहेत, तसंच चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासह अन्य काही कलाकारांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...