Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१९
नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीतल्या
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, जम्मू
काश्मीरमधल्या नेत्यांवरची कथित कारवाई आणि गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत केलेली कपात,
या मुद्यांचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सदनात उमटले. राज्यसभेत कामकाज सुरू होताच,
सभापती व्यंकय्या नायडू यांनी, नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या अभिनंदनाचा
प्रस्ताव मांडला, सदनानं एकमुखानं या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. मात्र त्यानंतर डाव्या
पक्षाच्या खासदारांनी, जेएनयूच्या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाच्या
खासदारांनी काश्मीरच्या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या
नायडू यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
लोकसभेचं
कामकाज सुरू होताच, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्यावर चर्चेला प्रारंभ
झाला, मात्र काँग्रेससह द्रमुक आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या
हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा
तास सुरू ठेवला. घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांवर कारवाईचा इशारा अध्यक्षांनी दिला. काँग्रेसचे
नेते अधीररंजन चौधरी यांनी गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपातीचा मुद्दा उपस्थित केला.
याच मुद्यावर स्थगन प्रस्तावही देण्यात आला होता, मात्र अध्यक्षांनी त्यांना हा मुद्दा
सदनासमोर मांडण्याची परवानगी दिली नाही. त्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी सभात्याग
केला.
त्यानंतर
सुरू झालेल्या शून्य प्रहरात, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं झालेल्या नुकसानीपोटी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावं,
अशी मागणी केली. नागपूरचे खासदार कृपाल तुमाने यांनी शेतकऱ्यांना बुरशीनाशकासाठी अनुदान
देण्याची मागणी केली. दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी, द्राक्ष बागायतदारांच्या
नुकसानाकडे लक्ष वेधून, अतिवृष्टीमुळे बाधित द्राक्ष उत्पादकांना सहाय्याची मागणी केली.
****
यंदाचा
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि प्रसिद्ध उद्घोषक डेव्हीड अटेनबरो
यांना जाहीर झाला आहे. इंदिरा गांधी स्मारक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांनी आज नवी दिल्लीत प्रसिद्धीपत्रक जारी केलं, त्यात ही घोषणा करण्यात
आली आहे.
****
पुणे मुंबई
द्रुतगती महामार्गावरच्या अपघातांचं प्रमाण लक्षात घेत, महामार्ग पोलिसांनी या मार्गावरची
वेगमर्यादा पुन्हा ताशी शंभर किलोमीटर इतकी केली आहे. नऊ पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेच्या
वाहनांसाठी आणि मालवाहू ट्रकसाठी ही मर्यादा ताशी ऐंशी किलोमीटर इतकी ठेवण्यात आली
आहे. हा नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांच्या मोबाईलवर लगेचच दंडाच्या कारवाईची नोटीस
येणार असून, चालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होण्याची कारवाईसुद्धा होऊ शकेल,
असा इशारा महामार्ग पोलिसांनी दिला आहे.
****
पुणे-सासवड
दरम्यान दिवेघाटात एका दिंडीला झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून
अन्य तीन वारकरी जखमी झाल्याचं वृत्त आहे. आळंदीला जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी विश्रांतीसाठी
बसलेले असताना त्यांना जेसीबीनं धडक दिल्यामुळे आज सकाळी हा अपघात झाला.
****
अमरावती
महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोळाव्या महापौरपदासाठी सहा तर उपमहापौरपदाकरता सात अर्ज
दाखल झाले आहेत. येत्या बावीस तारखेला यासाठीची निवडणूक होणार असून, पालिकेत भारतीय
जनता पक्षाला बहुमत आहे.भाजपकडून महापौरपदासाठी चेतन गावंडे तर उपमहापौरपदासाठी कुसुम
साहू यांची नावं निश्चित करण्यात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर
महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सूरमंजिरी लाटकर यांची
निवड झाली आहे. त्यांनी ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटगे यांचा अकरा मतांनी पराभव
केला. उपमहापौरपदी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संजय मोहिते यांची निवड झाली.
****
माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यानं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा
गांधी यांना आज अभिवादन करण्यात आलं. निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी
इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपजिल्हाधिकारी
मच्छिंद्र सुटे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
****
No comments:
Post a Comment