आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०२ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
ईद उल जुहा अर्थात बकरी ईद
आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विश्वास, त्याग आणि
सेवा हे या सणाची मूळ तत्वं असून, देशवासियांना या मूल्यांप्रती समर्पित व्हायला पाहिजे,
असं राष्ट्रपती शुभेच्छा संदेशात म्हणाले. ईदचा हा सण त्याग आणि करुणा यांचं प्रतिक
असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. तर ईदचा हा सण सौहार्द, बंधुता आणि एकतेची भावना वृद्धींगत
करेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
राज्यपाल सी विद्यासागर राव
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
जनसामान्यांसाठी राबवण्यात
येत असलेल्या योजनांची माहिती जनतेला करुन देण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं
राबवण्यात येत असलेल्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचं मराठवाड्यात ठिकठिकाणी आयोजन करण्यात
आलं आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन महिला
आर्थिक विकास महामंडळाचे औरंगाबाद जिल्हा समन्वयक विजय डोके यांनी केलं आहे. जालना
जिल्ह्यात खोपेगाव इथं संवादपर्व अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांचं शासकीय योजनांबाबत
प्रबोधन करण्यात आलं.
****
नागपूर - मुंबई दुरान्तो
एक्स्प्रेस आसनगाव - वाशिंद स्थानकादरम्यान रुळावरुन घसरल्यामुळे सिकंदराबादहून नांदेड,
औरंगाबादमार्गे मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते
नागपूर नंदिग्राम एक्स्प्रेस तसंच मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसही आज रद्द करण्यात
आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
विमुद्रीकरण निर्णयाचे परिणाम
दिसायला वेळ लागेल, असं अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बोलत
होते. विमुद्रीकरणामुळे दहशतवाद, निवडणुकांदरम्यान होणारा भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी
या सर्वांना चाप बसला असून, कर बुडव्यांनी नोटाबंदीनंतर कर भरुन पैसा पांढरा केला,
असंही बोकील यांनी नमूद केलं.
****
स्वच्छतेच्या विविध मानकांची
प्रत्यक्ष अंमलबाजवणी करणाऱ्या १७२ शाळांना काल दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री
प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार देऊन
गौरवण्यात आलं, यामध्ये महाराष्ट्रातल्या १५ शाळांनाही गौरवण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment