Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
ऊस उत्पादक शेतकरी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं,ऊसदरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला, आज अहमदनगर जिल्ह्यातल्या
शेवगाव इथे हिंसक वळण लागलं. पैठण शेवगाव रस्त्यावर घोटण,खानापूर, कऱ्हेटाकळी, एरंडगाव
आणि कुडगाव इथे आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखला आणि काही ठिकाणी जाळपोळ केली. आंदोलकर्त्यांना
पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीमाराचा वापर केला.यावेळी पैठण तालुक्यातल्या
तेलवाडी गावातले दोन शेतकरी जखमी झाल्याचं वृत्त आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी
पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केलं आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन तीन हजार
एकशे रुपये एकरकमी भाव मिळावा, अशी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. उसाच्या
किमान आधारभूत मूल्यामध्ये केंद्रसरकारनं यावर्षी दोनशे पन्नास रुपयांची वाढ केली असून,
साखर कारखान्यांनी उसाला हा भाव द्यावा, यावर सरकार ठाम असल्याचं सहकारमंत्री सुभाष
देशमुख यांनी म्हटलं आहे. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करू नये, असं
आवाहनही सहकारमंत्र्यांनी केलं आहे.
****
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या सात डिसेंबरला निवडणूक
होणार आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडून आमदारपदाचा राजीनामा दिल्यामुळे
ही जागा रिक्त झाली आहे.
****
वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर आजपासून लागू झाले
आहेत. एकशे अट्ठ्याहत्तर वस्तूंवरचा हा कर अट्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर,
तर आठ वस्तूंवरचा हा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर नुकताच आणण्यात आला आहे. उद्योग करण्यामध्ये सुलभता यावी
या दृष्टीनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा करात हे बदल केले
आहेत. यात, सर्व प्रकारच्या रेस्टॉरंट्सना पाच टक्के कर लागणार असून, या बदलाचं हॉटेल
आणि रेस्टॉरंट्सच्या संघटनेनं स्वागत केलं आहे.
****
राज्यातल्या यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचे
झालेले मृत्यू, हा राजकीय पक्ष आणि बियाणे कंपन्या यांच्यातल्या घातक युतीचा परिणाम
आहे, असा, विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप कृषीमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआयमार्फत
चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिलेले असल्यानं हा आरोप तथ्यहीन असल्याचं
त्यांनी म्हटलं आहे.बियाणे बाजारातली परदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचा
सरकारचा प्रयत्न असल्याचंही फुंडकर यांनी म्हटलं आहे.
****
शौचालयं बांधण्याच्या कामात राज्यात नांदेड जिल्ह्याचा
पहिला क्रमांक आहे. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत
एक लाख बारा हजार दोनशे तीन शौचालयं बांधण्यात आली आहेत. याबाबतीत राज्यात बीड जिल्हा दुसऱ्या आणि सोलापूर जिल्हा तिसऱ्या
क्रमांकावर आहे. नांदेड तालुका ‘उघड्यावर शौचापासून मुक्त’ झाला असल्याचंही आज घोषित
करण्यात आलं. हा लौकिक कायम राहण्यासाठी गावागावांमधून
गुड मॉर्निंग पथकांद्वारे जनजागृती करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात येत्या अठरा तारखेला,
जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबिर
होणार आहे. महाराजस्व अभियांतर्गत होणाऱ्या या शिबिरामध्ये, औसा तालुक्यातल्या शेतकरी
आणि नागरिकांच्या, शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी सोडवण्यात येणार आहेत. इच्छुकांनी
या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांच्या
चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला आज सुरुवात केली. या भेटीत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार
आहेत. ते आज गडचिरोली जिल्ह्याला भेट देत असून, जनसभांच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांच्या
समस्या जाणून घेणार आहेत.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात योगशास्त्र
विभाग सुरू होत आहे. येत्या शुक्रवारी, सतरा तारखेला,केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद
नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या विभागाचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
****
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं
आज विजयी सुरुवात केली. अमेरिकेच्या झांग बेवेन हिचा सायनानं २१-१२, २१-१३ असा सरळ
पराभव केला.
****
रसायनमिश्रित विषारी ताडीची विक्री करणारं एक मोठं रॅकेट उध्वस्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे. उत्पादन शुल्क विभागनं पुणे,
सातारा, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, कांदिवली, मीरा भाईंदर इथे विविध ठिकाणी
छापे घालून, ताडीत मिसळल्या जात असलेल्या क्लोरल हायड्रेट आणि अन्य रसायनांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment