आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
ॲट्रॉसीटी
कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज भारत
बंदची हाक दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात या
बंदला हिंसक वळण लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहादा शहरात बंद दरम्यान
चार बसेसची तडफोड करण्यात आली. त्यामुळे शहादा बस स्थानाची बस सेवा काही काळासाठी थांबवण्यात
आली आहे. राज्यात इतरत्र या बंदचा काही परिणाम जाणवत नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि बिलियर्ड्सपटू पंकज
अडवाणी यांच्यासह ४१ जणांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती भवनात आयोजित य कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या
नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावर्षी
८४ जणांना पद्म पुरस्कात जाहीर झाले, त्यापैकी ४३ जणांना गेल्या महिन्यात हे पुरस्कार
प्रदान करण्यात आले होते.
****
चीनची अवकाशातली एक प्रयोगशाळा
आज दक्षिण प्रशांत महासागरात कोसळली. आठ टन वजनाच्या तियानगोंग-१ या प्रयोगशाळेचा मोठा
भाग या क्षेत्रात कोसळल्याची माहिती चीननं दिली. २०११ साली या प्रयोगशाळेची स्थापना
करण्यात आली होती.
****
ठाणे
जिल्ह्यातल्या भिवंडी इथं गुंदवली ग्रामपंचायत क्षेत्रातल्या तेलाच्या गोदामाला मध्यरात्री
भीषण आग लागली. गोदामात तेलाचे डबे असल्यामुळे ते आगीत फुटले आणि ही आग बाजूच्या इतर
गोदामांमध्येही पसरली. त्यामुळे आसपासची १२ ते १५ गोदामं भस्मसात झाली. अग्निशमन दलाच्या
पाच ते सहा गाड्यांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमाराला आग आटोक्यात आणली. आगीचं कारण
अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली. सुदैवाने जिवीत
हानी झाल्याचं वृत्त नाही.
****
देशातल्या सर्व गावांना वीज उपलब्ध करून देण्याचं
सरकारचं उद्दिष्ट येत्या मे महिन्यात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सरकारच्या ग्रामीण
विद्युतीकरण कार्यक्रम दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजनेअंतर्गत एकूण अठरा हजार
४५२ गावांपैकी फक्त दोन टक्के गावांमध्येच वीज पोहोचवणं बाकी असून, स्वातंत्र्यानंतर
७० वर्षानंतरही वीज न पोहोचलेल्या गावांचा यात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी १५ ऑगस्ट २०१५ मध्ये या सर्व गावांमध्ये एक हजार दिवसांत वीज उपल्ब्ध करून देण्याचं
लक्ष्य ठेवलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment