Saturday, 14 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४   एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.

*****



o  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कमकुवत होऊ देणार नाही - पंतप्रधानांची ग्वाही; भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण 

o  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आज १२७ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून आदरांजली

o  ६५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

आणि

o  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक; १७ सुवर्णपदकांसह भारत तिसऱ्या स्थानावर कायम.

*****



 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कमकुवत होऊ देणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. काल दिल्लीत, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. दलितांवर अत्याचार या संज्ञेची व्याप्ती वाढवून त्यात एकूण ४७ कृत्यांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. उत्तरप्रदेशात उन्नाव तसंच जम्मू काश्मीर मध्ये कथुआ इथं घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी या घटनेतल्या पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचं, तसंच दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. केंद्र सरकारनं भेदभाव टाळून घटनात्मक व्यवस्थेनुसार काम करावं, हीच डॉ आंबेडकर यांची अपेक्षा होती, असं सांगतानाच, पंतप्रधानांनी, आपलं सरकार, सामाजिक न्याय आणि समानतेला प्राधान्य देत असल्याचं सांगितलं.



 नवी दिल्लीत बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या या स्मारकाला पुस्तकाचा आकार देण्यात आला आहे, या स्मारकात डॉ. आंबेडकरांची १२ फूट उंच कांस्य प्रतिमा, तथागत गौतम बुध्दांची ध्यानस्थ प्रतिमा, विविध वस्तू, छायाचित्रं तसंच ग्रंथांचं प्रदर्शन,  आणि ध्यान केंद्र उभारण्यात आलं आहे.

****

 मुंबईत इंदू मिल इथं उभारण्यात येणारं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पुढच्या दोन वर्षांत म्हणजे, १४ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल इंदू मिल परिसरात या स्मारकाच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. हे काम कालबध्द पध्दतीनं पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मध्यप्रदेशात महू इथं बाबासाहेबांच्या जन्मस्थळी त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत.

****

 औरंगाबाद इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेखक योगिराज बागुल यांचं, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी या विषयावर व्याख्यान होणार आहे. सकाळी अकरा वाजता हे व्याख्यान होईल, त्यापूर्वी सकाळी विद्यापीठ परिसरातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येणार आहे.



 लातूर इथं, आज सकाळी आंबेडकर चौक तसंच आंबेडकर पार्क इथं ध्वजारोहण करण्यात येणार असून, त्यानंतर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

 काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातून समता फेरी काढण्यात आली, आंबेडकर पार्क येथून निघालेली समता फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करून, आंबेडकर पार्क परिसरात विसर्जित झाली.



 दरम्यान, देशभरात आजपासून ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पोहनेर आणि उमरगा तालुक्यातल्या मुरळी या गावांचा यात समावेश आहे. पाच मे पर्यंत चालणाऱ्या या अभियानात विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

****

 राज्य सरकारच्या २३ मार्च रोजीच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी त्यांच्याजवळ असलेला प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार येत्या तीन महिन्यांत प्रशासनाकडे जमा करण्याचे निर्देश दिले. मात्र नागरिकांनी आपल्याकडच्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तुंची एका महिन्याच्या मुदतीत विल्हेवाट लावावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

 हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतला आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून ह्या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती  महामंडळाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 ६५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. चित्रपट सृष्टीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना जाहीर झाला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सुयश शिंदे दिग्दर्शित मयत - हा सर्वोत्कृष्ट लघुपट, नागराज मंजुळे यांना पावसाचा निबंध या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट  लघुपट दिग्दर्शन, राजेंद्र जंगले यांचा चंदेरीनामा - हा सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट, धप्पा या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार तर यशराज कऱ्हाडे यांच्या म्होरक्या या चित्रपटाला विशेष चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 पुरस्कार विजेत्या कलाकारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे.

****

 ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं. नेमबाजीत महिलांच्या ५० मीटर रायफल-थ्री पोझिशन प्रकारात महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं सुवर्ण पदक तर अंजुम मौदगिलनं रौप्य पदक जिंकलं, तर पुरुषांच्या गटात १५ वर्षीय अनिश भानवालानं २५ मीटर पीस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अनिश हा देशातला सुवर्ण पदक पटकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियानं सुवर्ण पदक जिंकलं. ९७ किलो वजनी गटात मौसम खत्रीनं, तर ५७ किलो वजनी गटात पुजा धानदानं रौप्य पदक तर ६८ किलो वजनी गटात दिव्या काकरन हीनं कांस्य पदक जिंकलं. टेबलटेनिस मध्ये महिला दुहेरीत मनिका बात्रा आणि मौमा दास जोडीनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १७ सुवर्ण, दहा रौप्य आणि बारा कांस्य पदकांची कमाई केली आहे.

****

 जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलस्वयंपूर्ण गावांच्या संख्येत भर पडल्याचं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या जुई धरणात सुरू असलेल्या कामाची शिंदे यांनी काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी, ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

 नांदुर मधमेश्वर कालव्यातून सिंचनासाठी पुरेशा पाण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तसंच गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काल औरंगाबाद इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आंदोलकांच्या विविध मागण्यांचं निवेदन आमदार प्रशांत बंब, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, आमदार सुभाष झांबड यांच्या शिष्टमंडळानं महामंडळांच्या कार्यकारी संचालकांकडे सादर केलं. सुमारे दोन पूर्णांक ५६ अब्ज घनफूट पाण्याचं दोन समान टप्प्यात आवर्तन देणं, तसंच नांदूर मधमेश्वर कालव्यासाठी संपादित जमिनीचा सरळ खरेदीद्वारे मोबदला देण्याची मागणी प्रशासनानं मान्य केल्याची माहिती आमदार बंब यांनी दिली.

****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडी इथले रहिवासी असलेले एकतीस वर्षीय जवान किरण थोरात यांच्या पार्थिव देहावर काल फकीराबादवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये गेल्या बुधवारी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात थोरात यांना वीरमरण आलं.

****

 परभणी जिल्हा पोलिसांनी वॉट्‍सॲप या सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या समूहप्रमुखांना सतर्कतेचा इशारा देत, आपल्या समूहावरून आक्षेपार्ह मजकूर पसरणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. राष्ट्रपुरुष, प्रार्थना स्थळं यांची मानहानी होईल किंवा धार्मिक भावना दुखावतील, असा मजकूर, छायाचित्र वा चित्रफीत प्रसारित होऊ नये, असं या बाबतच्या पत्रात म्हटलं आहे.



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहणार आहे. तर उद्या रविवारी हा विभाग सुरु राहणार असल्याचं वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं आहे.

****

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. काल सर्वाधिक ३९ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड इथं ३८ पूर्णांक पाच तर औरंगाबाद इथं ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उस्मानाबाद परिसरात काल सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावल्यानं, वातावरणात गारवा असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुढच्या दोन दिवसांत विभागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 7 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...