Wednesday, 11 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११   एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

*****



v औरंगाबाद जिल्ह्यातली श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

v ३१ मार्चपर्यंत वैधता न मिळवलेल्या खासगी रिक्षा जप्त करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

v संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या अडथळ्यांचा निषेधार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एक दिवसाचं उपोषण करणार

v मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा आणि हळद पिकांचं नुकसान

आणि

v गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारताच्या हीना सिद्धूला नेमबाजीत सुवर्ण पदक

****



 औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला सिंचन सुविधा देण्यासाठी श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल झालेल्या मंत्रिमंड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपये उपलब्ध करुन देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. वैजापूर तालुक्यातल्या १६ गावातल्या शेतकऱ्यांनी जायकवाडी जलाशयातून सिंचनासाठी पाणी आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती.

 ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याची विनंती राज्यपालांना करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

 पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चालाही काल मंत्रीमंडळानं मान्यता दिली. पुणे ग्रामीण भागातली पाच पोलिस स्थानकं आणि पुणे शहरातल्या नऊ पोलिस स्थानकांचा या आयुक्तालयात समावेश असेल.

****



 ‘शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पक्ष आहे. या देशातले तथाकथित सेक्युलर एकत्र होतील. तेव्हा या देशातल्या हिंदुत्त्ववाद्यांना एकत्र यावेच लागेल’ असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती होण्याचे संकेत दिले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. या मुलाखती दरम्यान राऊत यांनी विचारलेल्या राजकीय आणि इतर विविध प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तरं दिली.

****



 ३१ मार्च २०१८ पर्यंत वैधता न मिळवलेल्या खासगी रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. अवैध खासगी रिक्षांना अपघातासारख्या गंभीर प्रसंगी विमा किंवा इतर कुठल्याही प्रकारची मदत तसंच  अर्थसहाय्य मिळत नसल्यानं रिक्षाचालकांचं नुकसान होऊ नये म्हणून गेल्या वर्षी जुलै महिन्यात खासगी रिक्षांना शुल्क आकारुन परवान्यावर नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र राज्यातील चार लाख खासगी रिक्षांपैकी केवळ  २१० खासगी रिक्षांनी परवान्यावर नोंदणी केली असल्याचं रावते यांनी सांगितलं.

****

 भारतातील १२ ऐतिहासिक पर्यटन स्थळांची निवड आयकॉनिक साईटमध्ये करण्यात आली असून त्यात मराठवाड्यातील अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला असल्याचं केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी सांगितलं आहे. वर्मा यांनी काल अजिंठा लेणी तसंच पर्यटक दालनाला भेट देऊन सोयी सुविधांचा आढावा घेतला, यावेळी त्या बोलत होत्या. अजिंठासह वेरूळ इथल्या लेण्यांना पर्यटन विकासाच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा लवकरच पुरविण्यात येणार असल्याचं सांगून इथं उत्कृष्ठ रस्ते, पाणी, अद्ययावत यंत्रणा, उभारण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या.

****



 अहमदनगर शहरातल्या केडगाव उपनगरात झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणातला आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक सतीष माथूर यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. याठिकाणचा गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर असला तरी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं माथूर म्हणाले.

 दरम्यान, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून याप्रकरणी अटकेत असणाऱ्या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

****



 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आलेल्या अडथळ्यांचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. पंतप्रधान राजधानी दिल्ली इथं उपोषण करणार असून कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी असलेले अमित शहा हुबळी इथं उपोषण करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार देखील संसदेचं कामकाज अडवून धरल्याबद्दल काँग्रेस पक्षाचा निषेध करत आपापल्या मतदारसंघात उद्या उपोषण करणार आहेत.

****

 कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी औरंगाबादची मेसर्स निरंजन अलॉय स्टील कंपनी, पैठणची बाफना री रोलिंग मिल आणि परभणी जिल्ह्यातल्या मेसर्स त्रिधारा शुगर कंपनीची मालमत्ता भविष्य निर्वाह निधी विभागानं जप्त केली आहे. या कंपन्यांनी कामगारांच्या हक्काच्या असलेल्या या निधीची रक्क्म जमा केली नसल्याचं आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, जालना, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहराला काल दुपारनंतर पावसानं झोडपून काढलं. जिल्ह्यातल्या लाडसावंगी आणि फुलंब्री तालुक्यातल्या आळंद इथं पावसामुळं आंबा पिकाचं मोठं नुकसानं झालं आहे. लातूर जिल्ह्यात काल पाचव्या दिवशी पाऊस झाला. या पावसामुळं बागायत शेती आणि आब्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

 हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र काल रात्री उशिरा  विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं हळदीच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तहसील कार्यालयाच्या गौणखनिज पथकानं वाळुची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन टिप्पर मालकाकडून ९ लाख ५हजार २८० रूपयांचा दंड वसूल केला आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

 शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल उस्मानाबाद  जिल्ह्यात तुळजापूर इथं राष्ट्रीय महामार्गावर शेकडो क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतीमालाला हमीभाव, विमा संरक्षण आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

****



 औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याशीसंबधित असलेल्या  समांतर जलवाहिनी योजनेचं काम खाजगी सार्वजनिक भागीदारी -पीपीपी तत्वावर पुन्हा सिटी वॉटर युटिलिटी या कंपनीलाच देण्याचा निर्णय काल महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. जनतेचं हित लक्षात घेवून कंपनीबरोनबर पुन्हा नव्यानं करार करण्यात येणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. महापालिकेनं कंपनीसोबतचा करार गेल्या एक ऑक्टोबर२०१६ रोजी रद्द केला होता.

****



 सातारा जिल्ह्यात खंडाळा घाटात काल सकाळी झालेल्या टेम्पो अपघातातल्या मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. या अपघातात १९ जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. मजूर घेवून निघालेल्या टेम्पो चालकाचं एका वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

****



 ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत काल भारतानं अकरावं सुवर्ण पदक जिंकलं. नेमबाजीत २५ मीटर एयर पिस्टल प्रकारात हीना सिद्धूनं सुवर्ण पदक पटकावलं.

 हॉकीमध्ये भारतानं मलेशियाचा दोन - एक असा पराभव करुन उपान्त्य फेरीत प्रवेश केला. मोहम्मद अनास यानं ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. मिल्खासिंग नंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो भारताचा पहिलाच धावपटू आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण २० पदकं पटकावली आहेत.

****

 दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात काल १६३ वा रेल्वे सप्ताह साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्य करण्याकरिता सदैव तत्पर राहण्याचं आवाहन यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी केलं. त्यांच्या हस्ते विभागातल्या २९१ कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि रोख रक्क्म देऊन गौरव करण्यात आला.

****



 लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या तळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे अंतर्गत असलेल्या हरी भगीरथ उपसा जलसिंचन योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या २१३ शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्यात आल्याचं पत्र आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आलं.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...