Wednesday, 11 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

११ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या सोळाव्या मंत्रीस्तरीय बैठकीचं उद्घाटन केलं. नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं. जगातल्या नव्वद देशांचे मंत्री आणि प्रतिनिधी या बैठकीत भाग घेत असून, जागतिक स्तरावर ऊर्जेचं भविष्य, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीत भारताचं  प्रतिनिधित्व करत आहेत.

****

 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण आणि जातिप्रथेचं उच्चाटन यासाठी महात्मा फुले यांनी केलेले परिश्रम हे प्रेरणादायक  आहेत, अशा शब्दात राष्ट्रपतींनी, तर, स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या आणि शिक्षणप्रसाराच्या आपल्या ध्येयाशी महात्मा नेहमी प्रतिबद्ध राहिले, अशा शब्दात पंतप्रधानांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे.

****

 एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारताला बारावं सुवर्णपदक मिळालं आहे. नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या श्रेयसी सिंहनं हे सुवर्णपदक मिळवलं. तर, पुरुषांच्या पन्नास मीटर पिस्तूल नेमबाजीमध्ये भारताच्या ओम मिथरवालनं कांस्य पदक जिंकलं आहे. महिला मुष्टीयुद्धात एम.सी.मेरीकोम अट्ठेचाळीस किलो वजनगटाच्या अंतिम फेरीत पोचली आहे.

****

 अठरा वैद्यकीय उपकरणांच्या किमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी करणारा एक अहवाल राज्यशासनानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठवला आहे. यामध्ये कॅथेटर, कॅटेरॅक्ट लेन्सेस, डिस्पोजेबल सीरिंजेस, सलाईनचे सेट्स आणि यूरिन बॅग्ससह अन्य काही उपकरणांचा समावेश आहे. राज्यसरकारच्या या मागणीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तत्वत: मान्यता दिली असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 राज्यातले दहा आदिवासी विद्यार्थी माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च पर्वत शिखर सर करण्याच्या मोहिमेवर आज जात आहेत. हे विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आदिवासी निवासी शाळांमधले असून, त्यात तीन मुलींचा समावेश आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागानं हाती घेतलेल्या ‘शौर्य अभियाना‘ अंतर्गत हे विद्यार्थी या मोहिमेवर जात आहेत.

*****

***

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...