Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ एप्रिल
२०१८ दुपारी १.०० वा.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती आज सर्वत्र
उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत
आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज
मध्यप्रदेशात महू इथं बाबासाहेबांच्या जन्मस्थळी त्यांना आदरांजली अर्पण केली.
मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केलं. आंबेडकरांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे
प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लातूर इथं यानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या
वतीनं आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क या मार्गावरुन घोषवादन करत डॉ. आंबेडकरांना मानवंदना
देण्यात आली.
नांदेड इथं महापौर शिला भवरे यांनी बाबासाहेबांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्तानं शहराच्या विविध भागातून मोटारसायकल
रॅली काढण्यात आली, तसंच विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
औरंगाबाद इथं भडकलगेट इथल्या आंबेडकरांच्या पुर्णाकृती
पुतळ्याजवळ सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बाबासाहेबांच्या
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी
करण्यात आली.
यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात महावितरणच्या वतीनं
गरीब कुटुंबांची संख्या अधिक असलेल्या गावात शंभर टक्के विद्युतिकरण करण्यात येत आहे.
त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीरं लावण्यात येणार असून, लाभार्थ्यांना तात्काळ वीज जोडणी
देण्यात येणार आहे.
****
दरम्यान, यानिमित्तानं देशभरात आजपासून ग्रामस्वराज
अभियान राबवलं जाणार आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पोहनेर आणि उमरगा तालुक्यातल्या
मुरळी या गावांचा यात समावेश आहे. पाच मे पर्यंत चालणाऱ्या या अभियानात विविध योजनांची
अंमलबजावणी केली जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज छत्तीसगढमधल्या मागासलेल्या आणि नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यातल्या जांगला
गावात कायाकल्प योजनेचा शुभारंभ करत आहेत. आयुष्मान योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दीड लाख आरोग्य केंद्रांमधल्या पहील्या केंद्राचं
उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
****
कर्नाटक मधल्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर
होण्याआधीच फुटली नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. निवडणुकीच्या
तारखांबाबत केवळ अंदाज लावण्यात आला असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. काही
वृत्तवाहिन्यांवर निवडणुकीबाबतच्या तारखांची घोषणा करण्यात आली होती. परंतु, वृत्तवाहिन्यांना
याप्रकरणी अधिक जबाबदारीनं वागता आलं असतं, तसंच ज्यावेळी निवडणूक आयोग
निवडणुकांच्या तारखा जाहीर करत होतं, तेव्हा राजकीय पक्षांनीही याप्रकरणी
कुठल्याही प्रकारचं ट्वीट करणं योग्य नव्हतं, अशी
भूमिकाही निवडणूक आयोगानं मांडली आहे.
****
केंद्र सरकारनं आरोग्य योजनेतल्या प्रलंबित दाव्यांचा
निपटारा करण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
दिले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एका आठवड्याच्या आत ही समिती स्थापन
करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. या योजनेत पेंशन धारकांच्या दाव्यांचा कोणत्याही
अडचणींशिवाय निपटारा झाला पाहिजे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
ऑस्ट्रेलिया गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत
आज भारतानं चार सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. मुष्टीयुद्ध स्पर्धेत एम सी
मेरी कोमनं सुवर्ण पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध मध्येच पुरुषांच्या गटात ५२ किलो वजनी
गटात गौरव सोलंकीनं सुवर्ण पदक पटकावलं, तर ६० किलो वजनी गटात मनिष कौशिकनं, आणि ४९
किलो वजनी गटात अमित पंघालनं रौप्य पदक जिंकलं. नेमबाजीत संजीव राजपुतनं ५० मीटर रायफल
थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. भालाफेक मध्येही नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची
कमाई केली. भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत मनिका बत्रानं अंतिम
फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये
महिला एकेरीचा अंतिम सामना पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात होणार आहे. पुरुष एकेरीत के श्रीकांतनंही अंतिम फेरीत प्रवेश
केला.
स्क्वॅश स्पर्धेत मिश्र दुहेरीत दीपिका पल्लीकल आणि
सौरव घोशाल ही जोडी देखील सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आहे. महिलांच्या कुस्तीमध्ये
फ्रिस्टाईल प्रकारात साक्षी मलिक, विनेश फोगट यांचे, तर
पुरुषांच्या कुस्तीमध्ये सुमीत आणि सोमवीर यांचे सामने होणार आहेत. उंच उडी
प्रकारात अरपिंदर सिंग अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment