Sunday, 15 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ एप्रिल  २०१८ दुपारी १.०० वा.

****



 राज्य शासनाचे चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाले, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार, तर प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेत्री दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे.

 दोन्ही जीवन गौरव पुरस्कारांचं स्वरुप सन्मानपत्र आणि पाच लाख रुपये असं आहे तर दोन्ही विशेष योगदान पुरस्काराचं स्वरुप सन्मानपत्र आणि तीन लाख रुपये असं आहे. यंदाच्या ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.

****



 काश्मीरमध्ये कथुआ इथं झालेल्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

****



 उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातल्या अत्याचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्या निकटवर्तीयाला अटक केली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, लखनऊच्या विशेष न्यायालयानं आमदार सेंगर याला सात दिवसाच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे.

****



 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत केरळ सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारनेही या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केलेली आहे.

****



 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या कार्यालयात जेटली यांना शपथ दिली. उत्तरप्रदेशातून जेटली राज्यसभेवर निवडून गेले आहेत. आजारपणामुळे ते अधिवेशन काळात शपथ घेऊ शकले नव्हते.

****



 संसदेच्या स्थायी समितीनं देशातल्या पर्यटन आणि संस्कृतिविषयी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. देशातल्या पूर्व आणि पूर्वोत्तर भागातले मंदिरं आणि बौद्ध स्थळ, तसंच दक्षिण भागातल्या प्रसिद्ध मंदिरांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं समितीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यातल्या जास्तीत जास्त पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी खर्च अधिक होतो, त्याठिकाणी जाण्यासाठी वाहतून व्यवस्था योग्य नसल्याचं समितीनं नमूद केलं आहे. त्यामुळे पर्यटन मंत्रालयानं ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावं, ज्यामुळे महसुलात वाढ होईल, असं या अहवालात म्हटलं आहे.

****

 केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कौल आणि इतरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाशे एकवीस कोटी रुपयांचं अवैध कर्ज दिल्यामुळे बँकेचं सातशे सदोतीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयनं काल दिल्ली आणि मुंबईतल्या दहा ठिकाणी छापे टाकले. इरा इंजिनिअरींग इंफ्रा इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, दोन सनदी लेखापाल तसंच अन्य अज्ञात व्यक्तींच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

****



 आंतरराज्यीय मालवाहतूक करण्यासाठी ई-वे बील प्रणाली आजपासून आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तेलंगणा तसंच उत्तर प्रदेश या राज्यात लागू झाली आहे. एक एप्रिलपासून सुरु झालेल्या या प्रणालीमध्ये आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक ई बील जारी करण्यात आली आहेत.

****



 ऑस्ट्रेलिया गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारतानं २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदकांसह एकूण ६६ पदक मिळवून पदक तालिकेत तिसरं स्थान कायम राखलं आहे. ८० सुवर्णपदकांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर ४५ सुवर्ण पदकांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.

 आज झालेल्या स्पर्धांमध्ये भारतानं एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूचा २१-१८, २३-२१ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं. सिंधूला रौप्य पदक मिळालं. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात के श्रीकांतला रौप्य पदक, तर पुरुष दुहेरीत सात्विक रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनंही रौप्य पदक जिंकलं. स्क्वॅश मध्ये महिला दुहेरीत दिपिका पल्लीकल आणि जोशना चिनाप्पा यांच्या जोडीनंही रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत अनंत शरथ कमलनं, तर मिश्र दुहेरीत मनिका बत्रा आणि जी साथियान यांच्या जोडीनं रौप्य पदक जिंकलं.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...