Monday, 16 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६   एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.

*****



Ø  मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात काल वादळ –वारा आणि विजेच्या कडकडाटांसह पाऊस; राज्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू

Ø  राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांना राजकपूर जीवन गौरव, तर प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर

Ø  जम्मू काश्मीरमधल्या कटूआ इथल्या आठ वर्षाच्या मुलीवरच्या बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ औरंगाबाद, उस्मानाबाद लातूर आणि केज इथं मेणबत्ती मोर्चा

आणि

Ø  ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप, एकूण ६६ पदकांसह भारत तिसऱ्या स्थानावर

*****

 मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात काल वादळ -वारा आणि विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. यामध्ये वीज पडून जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला. शेतातल्या फळपिकांचही मोठं नुकसान झालं. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल काही भागात पाऊस पडला. लातूर जिल्ह्यात काल निलंगा, औसा, शिरुर अनंतपाळ तालुक्यात पाऊस झाला, यामुळे तापमानात घट झाली. औसा तालुक्यात किल्लारी इथं शेतात झाडाखाली झोपलेल्या एका जणाचा वीज अंगावर पडून मृत्यु झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या चार गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. अपसिंगा गावातल्या जवळपास ५०० घरावरची पत्रे उडून गेलीआहेत.
        नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट आणि पावसानं शेतकऱ्यांचं केळीच्या पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. केळीची झाड आडवी पडली आहेत. तर गारपीटीनं पानं फाटली आहेत. आंबा गळून पडला आहे तर टरबूज आणि खरबूज तसच भाजीपाला पिकांचही मोठ नुकसान झाल आहे. जिल्ह्यातल्या अर्धापूर, हदगाव, भोकर, हिमायतनगर, माहूर, मुदखेड, लोहा  आणि नांदेड या तालुक्यात काल हा पाऊस झाला. वाऱ्यामुळे विजेच्या तारांवर झाड उन्मळून पडल्यानं नांदेड शहराच्या काही भागातला वीज पुरवठा खंडीत झाला होता. शहराजवळच्या वाजेगाव इथं काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वीज अंगावर कोसळून एक युवक ठार झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले.

 परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यात संध्याकाळी सात वाजता गारपीट झाली. यात कांद्याचं मोठं नुकसान झालं.

 हिंगोली जिल्ह्यात काल कळमनुरी, आणि वसमत तालुक्यात काही भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. यामुळे हळदीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. औरंगाबाद शहरातही काल रात्री दहा वाजेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

 विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातल्या वेणी वाकोडी शिवारात काल वीज कोसळून चार ठार तर, चार  जण जखमी झाले. तसंच दोन बैल आणि सात शेळ्याही यात  दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हे आठही जण पाऊस पडत असल्यानं लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याचं वृत्त आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यातही वीज कोसळल्यानं प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

****

 राज्य शासनाचे चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांना राजकपूर जीवन गौरव पुरस्कार, तर प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार तर अभिनेत्री दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे.

 दोन्ही जीवन गौरव पुरस्कारांचं स्वरुप, सन्मानपत्र आणि पाच लाख रुपये असं आहे तर दोन्ही विशेष योगदान पुरस्काराचं स्वरुप, सन्मानपत्र आणि तीन लाख रुपये असं आहे. यंदाच्या ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.

****

 सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं राज्यातले १४ किल्ले निवडून त्यांचं जतन संवर्धन करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण केला. याबाबत ‘गड संवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिध्द करण्यात आलं आहे. या पुस्तकात रत्नागिरीतला शिरगाव किल्ला, नाशिक जिल्ह्यातले खर्डा, गाळणा हे किल्ले, पुणे जिल्हयातले तोरणा आणि भूदरगड, औरंगाबाद विभागातले अंतूर, परांडा आणि धारुर, नांदेड विभागातले औसा, कंधार आणि माहूर, तर नागपूर विभागातल्या नगरधन, अंबागड आणि माणिकगड या सर्व किल्ल्यांचं जतन आणि दुरुस्ती कशी करण्यात आली याबाबतची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 कोकणात नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत काल मनसेच्यावतीनं शंभर महिलांना ऑटो रिक्षांचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ठाकरे यांनी कठुआमधल्या ८ वर्षाच्या मुलीवरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाविरूद्ध जोरदार टीका केली. येत्या एक मे पासून आपण राज्याचा दौरा करणार सल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

 जम्मू काश्मीरमधल्या कटूआ इथं झालेल्या आठ वर्षाच्या मुलीवरच्या बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ काल औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, आणि केज इथं मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

 औरंगाबाद शहरात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान,  या घटनेतल्या आरोपींना कडक शिक्षा करावी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया कायदा लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कटूआ आणि उन्नाव घटनेमधल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. हे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये महिला संरक्षण विभाग स्थापन करावा आणि त्याठिकाणी महिला पोलिस अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करावी, गुन्हेगारांना पाठिशी घालणाऱ्या संघटनांवर कायमची बंदी घालावी आदी मागण्याही यावेळी उपस्थितांनी केल्या.

 लातूर इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शहरातील नागरीकांनी एकत्र येत या कटुआ आणि उनावमधल्या घटनांचा निषेध  नोंदवला. मानवी साखळीच्या माध्यमातून आणि विविध संदेश असलेले फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आले.

उस्मानाबाद इथं विविध पक्ष-संघटनांनी एकत्र येऊन सहभागातून आझाद चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मेणबत्ती मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आलं.

 बीड जिल्ह्यात केज  इथही संध्याकाळी आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढण्यात आला.

****

 ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट इथं झालेल्या २१व्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचा काल शानदार समारोप झाला. या स्पर्धेत भारतानं २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदकांसह एकूण ६६ पदकं मिळवत तिसरं स्थान पटकावलं. ८० सुवर्णपदकांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर ४५ सुवर्ण पदकांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.

 काल शेवटच्या दिवशी भारतानं एक सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सात पदकं पटकावली. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूचा २१-१८, २३-२१ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं. सिंधूला रौप्य पदक मिळालं. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात के श्रीकांतला रौप्य पदक, तर पुरुष दुहेरीत सात्विक रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनंही रौप्य पदक जिंकलं. स्क्वॅश मध्ये महिला दुहेरीत दिपिका पल्लिकल आणि जोशना चिनाप्पा यांच्या जोडीनंही रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत अचंता शरथ कमलनं, तर मिश्र दुहेरीत मनिका बत्रा आणि जी साथियान यांच्या जोडीनं रौप्य पदक जिंकलं.

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करताना, भारताच्या मुलींनी देशाची मान उंचावली असं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****

 सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं घेण्यात येणारं व्यसनमुक्ती संमेलन यंदा बीड इथं २१ आणि २२ एप्रिल रोजी होणार असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अभय बंग हे असल्याचे ते म्हणाले. यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाचा प्रारंभ व्यसनमुक्ती दिंडीनं होईल. विविध विषयांवर तीन चर्चासत्र, हास्य कवी संमेलन आणि पुरस्काराचं वितरण संमेलनादरम्यान होणार आहे.

****

 समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातल्या एक लाख ३० हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून, ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचं, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. सोनपेठ तालुक्यात काल समाधान शिबिराच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना ते बोलत होते. समाधान शिबिरात सर्व विभागाच्या ग्रामपातळीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं असल्याचं ते म्हणाले.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...