Monday, 16 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६  एप्रिल  २०१८ दुपारी १.०० वा.

****



  जम्मू काश्मीरमध्ये कठुआ इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी आजपासून सुरू झाली. या प्रकरणातल्या आठही आरोपींना आरोपपत्राची प्रत देण्याचे निर्देश जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी दिले. या सर्व आरोपींनी आपण निर्दोष असल्याचं सांगत, आपली नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. या आठ आरोपींपैकी अल्पवयीन आरोपीनं न्यायालयाकडे जामीनअर्ज दाखल केला आहे, या अर्जावर आज सुनावणी होणार असून, उर्वरित प्रकरणी पुढची सुनावणी येत्या २८ तारखेला होणार आहे.

****

 हैदराबाद इथं मक्का मशीदीत २००७ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयानं पाचही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या आरोपीं विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा ठोस पुरावे दाखल करून न शकल्यानं, न्यायालयानं हा खटला निकाली काढला.

****

 माजी खासदारांना निवृत्ती वेतन आणि प्रवास भत्ते देण्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. एका अशासकीय संस्थेनं, ही याचिका दाखल केली होती. न्यायालयानं, गेल्या सात मार्चला या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयानं, ही याचिका फेटाळून लावल्यावर याचिकाकर्त्या संस्थेनं, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. केंद्र सरकारनं, या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना, संसद सदस्यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही त्यांची सन्मान कायम राहावा, यासाठी निवृत्ती वेतन आणि प्रवास भत्ते देणं गरजेचं असल्याचं, न्यायालयासमोर सांगितलं होतं.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी स्वीडन आणि इंग्लंडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. व्यापार गुंतवणुकीसह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा उद्देश असलेल्या या दौऱ्यात ते लंडनमध्ये थेम्स नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. पंतप्रधान २० एप्रिलला जर्मनीत चान्सलर ऍंजेला मार्केल यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमधे प्रांतीय तसंच आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर चर्चा होणार आहे.

****

 माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा पुत्र कार्ती चिदंबरम याला केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या दोन याचिकांमध्ये अटक करण्याला दिल्ली उच्च न्यायालयानं, दोन मे पर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये एयरसेल मॅक्सिस प्रकरणाशी संबंधित या दोन याचिका आहेत.

****

 लष्कर कमांडरांची द्विवार्षिक परिषद आज नवी दिल्ली इथं सुरु होत आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे या परिषदेत उद्घाटनपर भाषण करणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत वरिष्ठ कमांडर, लष्कराशी संबंधित विविध मुद्यांसह देशाच्या उत्तर सीमेच्या संरक्षण क्षमतावृद्धी संदर्भात देखील चर्चा करणार आहेत.

****

 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आय आर एन एस एस - वन -आय या दिशादर्शक उपग्रहाला कक्षेत स्थिर करण्याचा चौथा आणि शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. हा उपग्रह आता पस्तीस हजार तीनशे एक्याऐंशी किलोमीटर उंचीवर स्थिर झाला आहे. दिशादर्शक उपग्रह शृंखलेतला हा आठवा आणि अंतिम उपग्रह आहे. हा संपूर्ण भारतीय बनावटीचा उपग्रह अपेक्षित असलेली नेमकी ठिकाणं भारतीय वापरकर्त्यांना उपलब्ध करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

****

 औरंगाबाद इथं आज महिला मंडळ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था यांच्या वतीनं श्रीमती सुशिलाताई पंडितराव नाईक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संस्थाचालक, शिक्षक, पालक समन्वय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जालन्याच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत यांचं 'आजच्या शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हानं' या विषयावर व्याख्यान झालं. सद्यस्थितीत शाळा एकोणिसाव्या शतकातल्या, शिक्षक विसाव्या शतकातले आणि विद्यार्थी एकविसाव्या शतकातले असल्यामुळे, या विद्यार्थ्यांना आपण शिकवतोय, की त्यांच्या शिक्षणात अडथळा आणतोय, अशी शंका निर्माण होत असल्याचं कुमावत यावेळी म्हणाले. विद्यार्थी केवळ माहितीचे वाहक बनले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

****

 रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीनं शेगाव - खामगाव - जालना रेल्वे मार्गासाठी  गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेलं सत्याग्रह आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रेल्वेमार्गाबाबत ठराव मंजूर करून, मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांशी बैठक घेऊ, तसंच समितीच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्याबाबत ठोस पावलं उचलली जातील, असं आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिल्यानंतर,  पुढच्या ४५ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.   

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...