Thursday, 12 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

विरोधी पक्षांच्या असहकारामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात काहीही कामकाज होऊ शकलं नाही, याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज देशभरात उपोषण करण्यात आलं. मुंबईत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, किरीट सोमय्या, आशिष शेलार हे उपोषणाला बसले होते. लातूर इथं खासदार सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वात, जालना इथं आमदार संतोष दानवे यांच्या, तर उस्मानाबाद इथं प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आलं. कोल्हापूर इथं खासदार अमर साबळे यांनी, सोलापूर इथं खासदार शरद बनसोडे यांनी उपोषण केलं.

****

राज्यातल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या कर्मचाऱ्यांना येत्या एक मे पर्यंत सातवा वेतन आयोग लागू न केल्यास पुन्हा एकदा संप करण्याचा इशारा एस टी कामगार संघटना-इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. ते आज नाशिक इथं झालेल्या एस टी कामगारांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी सरकारनं सातवा वेतन आयोग न दिल्यानं कामगारांनी दिवाळीत संप पुकारला होता आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो मागे घेतला होता.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं २३ जागांपैकी १३ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपनं नऊ आणि काँग्रेस पक्षानं एक जागा जिंकली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा परदेशी या एक हजार ७६४ मतांनी विजयी झाल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडी प्रणित आजरा शहर विकास आघाडीनं नगराध्यक्ष पदासह नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीला सहा, तर परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावं लागलं.

****

दरम्यान, राज्यात सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं चार नगराध्यक्षपदं आणि सर्वाधिक पन्नास नगरसेवकपदं जिंकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

****

अहमदनगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना सोडण्याची मागणी करत कर्डिले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली होती.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे याला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज रंगेहात पकडलं. क्रीडा प्रशिक्षकाला मानधनाचा धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडी इथले रहिवासी असलेले एकतीस वर्षीय जवान किरण थोरात यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी आठ वाजता फकीराबादवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये काल पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आलं.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान सागर वाकोडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव इथं उपचार सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बेमुदत बंदचा आज चौथा दिवस आहे. मेटाकुटीला आलेल्या कर्मचाऱ्यांनी नऊ महिन्यांच्या थकित वेतनासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सुमारे साडेचारशे कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. 

****

ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. कुस्तीमध्ये सुशील कुमारनं ७४ किलो वजनी गटात, तर बीडच्या राहुल आवारेनं ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये बबिता कुमारीनं ५३ किलो वजनी गटात, नेमबाजीत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं, तर थाळीफेक मध्ये सीमा पुनिया हिनं रौप्य पदक जिंकलं. थाळीफेकमध्येच नवजीत धिल्लो हिनं कांस्य पदक पटकावलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

****

दरम्यान, कुस्तीपटू राहुल आवारेनं सुवर्ण पदक मिळवल्यानं बीड जिल्ह्यातल्या पाटोदा या त्याच्या गावी आनंदोत्सव सुरु झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...