Saturday, 14 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुमुखी व्यक्तिमत्वाचे धनी होते आणि त्यांनी जीवनभर जातीभेद आणि पूर्वग्रहमुक्त आधुनिक भारताच्या निर्माणासाठी संघर्ष केला असल्याचे गौरवोद्गार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. ते आज मध्य प्रदेशमधल्या बाबासाहेबांच्या मूळ जन्मगावी महू इथं त्यांच्या स्मारकस्थळी आयोजित जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. समाजात समानता आणण्यासाठी बाबासाहेबांनी नेहमी अहिंसेचा मार्ग निवडला असल्याचं तरुण पिढीने ध्यानात घ्यायला हवं, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मुंबईत चैत्यभूमी इथं डॉ.आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांनी, तर परभणी इथं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा आज समारोप झाला.

****

जालना शहरात गांधी चमन चौकातून काढण्यात आलेल्या संविधान रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

नांदेड इथं महापौर शीलाताई भवरे, आमदार डी.पी.सावंत यांनी शहरातल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

औरंगाबाद इथं आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं ‘डॉ.बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या विषयावर विशेष व्याख्यान झालं. आंबेडकरांच्या एकूण ३६ वर्षांच्या चळवळीमध्ये दलितेतर सहकाऱ्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं साहित्यिक योगीराज बागुल यांनी यावेळी सांगितलं.

****

देशातल्या मागासलेल्या जिल्ह्यात नव्या उमेदीनं काम करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. छत्तीसगढमधल्या मागासलेल्या आणि नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यातल्या जांगला गावात ‘कायाकल्प’ योजनेचा शुभारंभ तसंच ‘आयुष्मान’ योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दीड लाख आरोग्य केंद्रांमधल्या पहिल्या केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बीजापूरमध्ये पंतप्रधानांनी आज विविध योजना तसंच विकास कामांचा शुभारंभ केला.

****

जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनावणी, जलदगती न्यायालयात घ्यावी अशी मागणी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. या आशयाचं एक पत्र त्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लिहीलं आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन पोलिसांना निलंबित करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात दिवाणखवटी इथं मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात झाला. महामार्गाचं चौपदरीकरण सुरु असून, दुभाजकाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरची वाहतूक बंद पाडली होती.

****

ऑस्ट्रेलिया गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतानं आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनसमध्ये महिला एकेरीत मनिका बत्रानं सुवर्ण पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मुष्टीयुद्धमध्ये विकास कृष्ण यानं ७५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत शरथ कमल आणि जी साथियान यांच्या जोडीनं रौप्य पदक जिंकलं. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात महिलांच्या गटात विनेश फोगाटनं ५० किलो वजनी गटात तर पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात सुमितनं सुवर्ण पदकांची कमाई केली. साक्षी मलिकनं ६२ किलो वजनी गटात, तर सोमवीरनं ८६ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तत्पूर्वी, आज सकाळी मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोम आणि गौरव सोलंकीनं सुवर्ण, तर मनिष कौशिक आणि अमित पंघालनं रौप्य पदक जिंकलं. नेमबाजीत संजीव राजपुतनं, तर भालाफेक मध्ये नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली.         

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...