आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक विधानसभेत आज दुपारी चार वाजता विश्वासदर्शक
ठराव मांडला जाणार आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज विधानसभेचं एक दिवसाचं
विशेष आधिवेशन बोलावलं असून, मुख्यमंत्री बी. एस
येडियुरप्पा विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. त्याआधी
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देत आहेत. बहुमत
सिद्ध होईपर्यंत कोणताही प्रमुख धोरणात्मक
निर्णय घेऊ नये, असे आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण
रेषेजवळ सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
झाले. काल रात्रीच्या सुमारास कवनार हंदवाडा परिसरात जवानांनी दहशतवाद्यांच्या एका
गटाला थंबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या परिसरात
अजून दोन दहशतवादी लपले असून, शोधमोहीम सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मेंढी सुधार प्रकल्पाची देशपातळीवरील वार्षिक आढावा
बैठक आज आणि उद्या अहमदनगर इथं होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि राजस्थानच्या
केंद्रीय मेंढी आणि लोकर संस्था यांच्या वतीनं आयोजित या बैठकीत देशातले २५ शास्त्रज्ञ
सहभागी होणार आहेत. मेंढी संदर्भातल्या संशोधनाची पुढील दिशा आणि संशोधनाची देवाणघेवाण
यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
****
दक्षिण कोरियामधल्या दोंघाई इथं सुरु असलेल्या आशियाई
महिला हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आज भारताचा सामना यजमान दक्षिण कोरियाच्या संघासोबत
होणार आहे. या स्पर्धेत भारतानं पहिल्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. या स्पर्धेचा
अंतिम सामना उद्या होणार आहे.
****
कृषी विकासाशी संबंधित विविध ११ विभागातली रिक्त
पदं १०० टक्के भरण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. ही पदभरती कंत्राटी स्वरुपाची
नसून कायमस्वरुपी राहणार असल्याचं वित्त विभागानं स्पष्ट केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment