Monday, 9 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 भारतात झीरो बजेट सेंद्रीय शेतीवर भर दिला जात असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 दिल्लीत ग्रेटर नोएडा इथं सुरु असलेल्या, वाळंवटीकरणाविरोधात लढा या विषयावरच्या संयुक्त राष्ट्र सभेच्या कौन्फरन्स ऑफ पार्टीजच्या चौदाव्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते.

 प्लास्टिक कचऱ्यामुळे जमीनीच्या होत असलेल्या नुकसानाकडे लक्ष वेधताना पंतप्रधानांनी एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. भारताला दोन वर्षांसाठी या परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आहे. वाढतं वाळवंटीकरण थांबवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी, ही परिषद घेतली जात असून यात जगभरातल्या विविध देशांचे सुमारे सात हजार दोनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत पर्यावरण, विशेषत: जमीनीचं बळकटीकरण, जमीनीची धूप रोखणं, तसंच धुळीची वादळं आणि दुष्काळाच्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं ३० निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता आहे.
****

 नंदुरबारमधल्या बालहुतात्म्यांना आज ७३ व्या स्मृतीदिना निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. १९४२च्या भारत छोडो चळवळीत नऊ सप्टेंबर १९४२ रोजी नंदूरबार शहरातून निघालेल्या एका मोर्चाचं नेतृत्व करत असलेला सोळा वर्षांचा शिरीषकुमार आणि त्याच्या पाच साथीदांरावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. या स्मृतीदिवसाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थी, तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हुतात्मा स्थळावर पुष्पहार अर्पण करत आणि हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
****

 महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या संजय सरोवर तसंच पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात असल्यानं, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाज़े २ मीटरने उघडण्यात आले असून सध्या १३ हजार ७३९ घनफूट प्रतिसेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना त्यामुळे पुराचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. नागरिकांना खबरदारीचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आला आहे.

 सांगली जिल्ह्यातही कृष्णा तसंच वारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं, तीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

 राज्यात अनेक जिल्ह्यात आज पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पावसासह पावसाची संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 ठाणे जिल्ह्यात मात्र पावसानं काही भागात आज विश्रांती घेतली, तर अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

 औरंगाबाद शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरू आहे.
****

 राज्यातला महापूर आणि दुष्काळ या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम एक महिनाभर उशीराने म्हणजेच ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबर महिन्यात सुरू केला जाणार आहे. गाळप परवान्यासाठी आत्तापर्यंत २६ साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यावर्षीचा गाळप हंगाम साठ दिवस चालणार असून ५० लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****

 लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत-पारदर्शक पद्धतीनं धान्य वितरण होण्यासाठी नवी संगणकीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था राज्याभर राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गंत एकूण एकशे त्रेचाळीस लाखांहून अधिक शिधापत्रिकांची आधार जोडणी झाली. रास्त भाव दुकानात आधार संलग्न व्यवस्था कार्यान्वित केल्यानं लाभार्थ्यांना निवासी क्षेत्राखेरीज राज्यात कोणत्याही रास्त भाव दुकानांत अन्नधान्य मिळणार आहे. सध्या एक कोटींहून अधिक कुटुंब जैवमीतीय -बायोमेट्रिक प्रमाणीकरण शिधापत्रिका वापरत आहेत.
****

 अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दिला जाणारा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी मुंबई इथले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, अस या पुरस्काराच स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. भगवानराव लोमटे यांच्या स्मृतिदिनी येत्या १९ सप्टेंबरला हा पुरस्कार भावे यांना अंबाजोगाई इथं समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.  
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...