Tuesday, 10 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१० सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे मंदीची लाट आली असल्याची टीका  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल परभणी इथं वार्ताहारांशी बोलत होत्या. सध्या राज्याचा दौरा करत असलेल्या सुळे यांनी काल हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या जनतेशी संवाद साधला. वस्तू आणि सेवा कर, चलन विमुद्रीकरण हेच मंदीचं प्रमुख कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीपदाचं आमीष दाखवून तसंच अंमलबजावणी संचालनालयासारख्या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात ओढत असल्याचा आरोपही खासदार सुळे यांनी यावेळी केला.
****

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज आपल्या आईसलँडच्या दौऱ्याची सुरुवात करताना भारतीय व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. ते काल आईसलँड, स्वित्झलँड आणि स्लोवेनिया या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
****

 जम्मू – काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी एकच संयुक्त उच्च न्यायालय राहील असं राज्य न्यायिक अकादमीचे अध्यक्ष राजीव गुप्ता यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासित प्रदेश म्हणून विधानसभा बनवली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
****


 राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाच्या औरंगाबाद पथकानं काल  जालना औद्योगिक वसाहतीमधून आंतरराज्य मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये ई – वे बिल चुकवून एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल वाहतूक करणाऱ्या पस्तीस मालवाहतूकदारांना सुमारे पंचवीस लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं सहायक राज्यकर आयुक्त धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरड शहापूर इथल्या तलाठ्याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आलं. शेतीच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. 
****

 भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर्द धरणाचं पाणी सोडल्यानं गडचिरोली - नागपूर आणि गडचिरोली - चार्मोशी मार्गावरील नद्यांना पूर आले आहेत. या पुरांमुळे दोन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. आष्टी - गोंडपिपरी मार्गही बंद आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज गावातील हनुमान वार्डमध्ये पुराचं पाणी शिरलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...