Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –15 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
आगामी
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज पुणे इथं महाजनादेश यात्रेदरम्यान वार्ताहरांशी
बोलत होते. युती सरकारच्या पाच वर्षाच्या कामकाजाबद्दल आपण समाधानी असून, रोजगार निर्मितीत
महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सायंकाळी
सातारा शहरात पोहोचलेल्या या महाजनादेश यात्रेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचं
स्वागत केलं. साताऱ्यातील सभेनंतर कराड इथंही मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. तिसऱ्या
आणि अखेरच्या टप्प्यात ही यात्रा मंगळवारी रत्नागिरीत पोहोचेल, अशी माहिती भाजपाचे
प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली.
****
येत्या
दोन-तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ
राज्यातल्या जनतेला होईल, असं मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी पुण्यात सांगितलं. बारामतीच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण, जळगावच्या पंडित दीनदयाळ
उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
बांधकामाचं भूमिपूजन आणि मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाच्या शासकीय अतिविशेष उपचार इमारतीचं
भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालं. त्यावेळी ते बोलत
होते.
****
सत्तेत
आल्यावर रोजगार निर्मितीचं काम करण्याऐवजी या सरकारनं रोजगार बंदीचं काम केलं, अशी
टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नवी मुंबईतल्या नेरूळ इथं
आज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कष्टकऱ्यांच्या हाताला
मान देण्याऐवजी मूठभर श्रीमंताच्या मागं उभी राहण्याची आजच्या राज्यकर्त्यांची नीती
असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाला सोडून गेलेल्यांना दिल्लीत अपमानास्प्द वागणूक
मिळेल, असं वक्तव्यही त्यांनी केलं.
****
कीटकनाशकं
व खतांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी
कमी उत्पादन खर्चामध्ये प्रदूषणमुक्त व रसायनमुक्त सेंद्रीय शेती करावी, असं मत केंद्रीय
रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. डॉ. पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठातर्फे नागपूर इथं आज राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली
सेंद्रीय शेतीचं महत्व विषद करणाऱ्या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी
बोलताना गडकरी यांनी सेंद्रीय शेतकी उत्पादनाची मागणी वाढल्यास शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन
मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
****
सांगली
प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय
जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबतच शिराळा तालुक्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी
पक्षातल्या आपापल्या पदांचे राजीनामे दिले. उद्या सकाळी कासेगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते रीतसर भाजपात प्रवेश
करणार आहेत. सत्यजित देशमुख हे विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव
आहेत.
****
लातूरचे
खासदार सुधाकर श्रुंगारे यांनी आज इथल्या रेल्वे स्थानकाला भेट देऊन सोयीसुविधांची
पाहणी केली. श्रुंगारे यांच्या हस्ते उच्च श्रेणी वातानुकूलित प्रतिक्षालयाचं उद्धाटन
करण्यात आलं. तसंच स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. नियमित स्वच्छता ठेवणाऱ्या या रेल्वे
स्थानकाला त्यांनी २५ हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या
पेठशिवणी इथल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरी प्रस्तावाला आचारसंहिता लागू
होण्यापूर्वी मंजुरी द्यावी,
या मागणीसाठी परिसरातील २३ गावांतल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून आंदोलन करण्याचा
इशारा दिला आहे.
पालम तालुक्यातलं आरोग्य केंद्र वाढत्या लोकसंख्येला
सुविधा पुरवण्यात कमी पडत असून, पेठशिवणी इथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी शासनाकडं पाठवला आहे.
****
परभणी इथल्या
श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा
ट्रस्टच्या वतीनं देण्यात
येणारा सेवा गौरव पुरस्कार यावर्षी उस्मानाबाद इथले सामाजिक कार्यकर्ते अतुल अजमेरा
यांना आज प्रदान करण्यात
आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व २१ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
मुदखेड
ते परभणी दरम्यान सुरू असलेल्या रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे येत्या १८ ते
२० सप्टेंबर दरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरानं
धावणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात
जागोजाग विखुरलेल्या प्राचीन मूर्ती, शिल्पं, मंदिरं, लेणी स्थापत्याचा
अभ्यास करण्याच्या दृष्टीनं
आज औरंगाबाद इथं मूर्ती व शिल्प
संशोधन परिषद स्थापन करण्यात आली. दुर्लक्षित पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेऊन
त्याचा अभ्यास करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील, असं
परिषदेचे अध्यक्ष
डॉ. झाकीर पठाण, उपाध्यक्ष डॉ. स्मिता
शिंदे आणि प्रा. संजय पाईकराव यांनी
सांगितलं.
****
भारत आणि
दक्षिण आफ्रीका यांच्यातली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आजपासून सुरू होत आहे.
धरमशाला इथं संध्याकाळी सात वाजता या मालिकेतला पहिला सामना सुरू होईल. आकाशवाणीवरून
या सामन्यांचं धावतं समालोचन प्रसारित केलं जाईल.
****
No comments:
Post a Comment