Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१६ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø मोटार वाहन
कायद्यातल्या दंडाच्या रकमेत सुधारणा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
Ø विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी सव्वाशे जागा लढवणार तर उर्वरीत
३८ जागा मित्र पक्षांना देणार
Ø विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभेची निवडणूक
होणार- मुख्यमंत्री
Ø
पैठणचं जायकवाडी
धरण काल पूर्ण भरल्यानं नदीपात्रात
पाण्याचा विसर्ग सुरू
आणि
Ø उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याविरूद्ध
शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
****
सामान्य माणसांना
जाचक ठरणाऱ्या मोटार वाहन कायद्यातल्या दंडाच्या रकमेत सुधारणा करण्याचे संकेत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र त्याचबरोबर कायद्याच्या प्रतिबंधक मूल्यांबाबत
कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना
मुख्यमंत्र्यांनी, मोटार वाहन कायद्यातल्या सुधारणांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचं
सांगितलं. यापूर्वीच्या कायद्यातल्या तरतुदी फारशा कडक नव्हत्या, त्यामुळे अपघात आणि
वाहतूक नियमांचा भंग करणारे लोक दंडाची रक्कम सहज भरून निघून जात असत, असं ते म्हणाले.
या लोकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी कडक तरतुदींची आवश्यकता होती. नव्या कायद्यातल्या
दंडाच्या रकमेबाबत मतभेद असून त्यात सुधारणा करून या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल,
असं ते म्हणाले.
****
येत्या दोन-तीन वर्षात
वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातल्या जनतेला
होईल, असं मुख्यमंत्र्यांनी काल दुपारी पुण्यात सांगितलं. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण, जळगावच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय
एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचं भूमिपूजन
आणि मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाच्या शासकीय अतिविशेष उपचार इमारतीचं भूमिपूजन फडणवीस
यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालं. त्यावेळी ते बोलत होते. .
****
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवणार असून उर्वरीत ३८ जागा मित्र पक्षांना देण्यात
येणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल
पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना दिली. दोन्ही पक्षांमध्ये ५ ते ६ जागांच्या अदलाबदलीबाबत
चर्चा सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.
****
सत्तेत आल्यावर रोजगार निर्मितीचं काम करण्याऐवजी
या सरकारनं रोजगार बंदीचं काम केलं, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी केली आहे. नवी मुंबईतल्या नेरूळ इथं काल झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता
मेळाव्यात ते बोलत होते. कष्टकऱ्यांच्या हाताला मान देण्याऐवजी मूठभर श्रीमंताच्या
मागं उभी राहण्याची आजच्या राज्यकर्त्यांची नीती असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाला सोडून गेलेल्यांना दिल्लीत अपमानास्प्द वागणूक मिळेल, असं वक्तव्यही
त्यांनी यावेळी केलं.
****
येत्या विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभेची
निवडणूक होणार आहे. यात उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याचं आवाहन करत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा काल सातारा इथं महाजनादेश यात्रेच्या
सभेत केली. त्याचबरोबर सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजे भोसले यांची उमेदवारी
जाहीर केली. सातारा शहरातल्या सिमेंट रस्त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी, वैद्यकीय
महाविद्यालयासह शहराच्या हद्दीवाढीचा प्रश्न निकाली काढणार असल्याची घोषणा त्यांनी
यावेळी केली.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष
पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते
काल पुणे इथं महाजनादेश यात्रेदरम्यान वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी युती सरकारच्या
पाच वर्षाच्या कामकाजाबद्दल आपण समाधानी असून, रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या
क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातले कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस
सत्यजित देशमुख यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय
घेतला आहे. त्यांच्या सोबतच शिराळा तालुक्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षातल्या
आपापल्या पदांचे राजीनामे दिले. आज कासेगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते रीतसर भाजपात प्रवेश करणार आहेत. सत्यजित देशमुख
हे विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठणचं जायकवाडी धरण काल शंभर
टक्के भरल्यानं त्याच्या चार दरवाजांमधून दोन हजार ४८ दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी काल
संध्याकाळी सहा वाजेपासून नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. धरणाजवळच्या जलविद्युत केंद्रासह
डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही पाणाचा विसर्ग केला जात आहे.
दरम्यान, पाणी सोडण्याच्या
पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात
गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाल्यानं याआधीही धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि इतरांविरुद्ध एका शेतकऱ्यास फसवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा
गुन्हा ढोकी पोलीस ठाण्यात काल नोंदवण्यात आला. तेरणा सहकारी साखर कारखाना, वसंतदादा
बँक आणि जयलक्ष्मी शुगर्स कारखान्याच्या तत्कालिन संचालक, चेअरमन यांनी संगनमताने कसबे
तळवडे गावातले शेतकरी दिलीप ढवळे यांच्या शेतीवर कर्ज उचलण्यात आलं होतं. या कर्जाची
परतफेड करण्याची हमी तेरणा सहकारी साखर कारखान्यान घेतली होती, मात्र कर्ज परतफेड न
झाल्यानं ढवळे यांचं शेत वसंतदादा बँकेनं लिलावात काढलं. या मानहानीमुळे ढवळे यांनी
१२ एप्रिल २०१९ रोजी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह इतरांनी फसवणूक केल्यांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. यावरुन त्यांचे भाऊ राज ढवळे यांनी पोलिसात
तक्रार दाखल केली होती.
****
राज्यात महापुरुषांची नाव आणि त्यांचे कार्य यावर चांगले
शब्द कानी पडणे कमी झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील धोरणे ज्यांना समजले नाही, तेच आता
एक कलमी धोरण राबवून शिक्षणाचं वाटोळे करत आहेत, अशी टिका आमदार अमित देशमुख यांनी
राज्य शासनावर केली. लातूर इथं
काल कर्मयोगी खाजगी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण
सभेत देशमुख बोलत होते.
दरम्यान, लातूर शहरात काँग्रेसचं जनसंपर्क अभियान
सुरु असून, या अभियानातंर्गत विविध विकास कामांच उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते काल
करण्यात आलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातले माजी मंत्री बी.जी. खताळ पाटील
यांचं आज पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी संगमनेर इथं निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी
चार वाजता संगमनेर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या पेठशिवणी इथल्या नवीन प्राथमिक
आरोग्य केंद्राला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजुरी द्यावी,
अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आसपासच्या २३ गावातल्या नागरिकांनी दिला
आहे. पालम तालुक्यातलं आरोग्य केंद्र वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यात कमी पडत
असून, पेठशिवणी इथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी
मंजुरीसाठी शासनाकडं पाठवला आहे.
****
परभणी इथल्या श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा
ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा सेवा गौरव पुरस्कार यावर्षी उस्मानाबाद इथले सामाजिक
कार्यकर्ते अतुल अजमेरा यांना काल प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि
२१ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
मुदखेड ते परभणी दरम्यान सुरू असलेल्या रेल्वेमार्ग
दुहेरीकरणाच्या कामामुळे येत्या १८ ते २० सप्टेंबर दरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द
करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरानं धावणार आहेत. नांदेड ते मेदचल, नांदेड
ते निझामाबाद, पूर्णा ते आदिलाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आदिलाबाद
ते नांदेड एक्स्प्रेस मुदखेड पर्यंत रद्द करण्यात आली आहे. काचीगुडा ते मनमाड गाडी,
काचीगुडा ते मुदखेड अशी धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
ही माहिती दिली.
****
मराठवाड्यात जागोजाग विखुरलेल्या प्राचीन मूर्ती,
शिल्पं, मंदिरं, लेणी स्थापत्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं काल औरंगाबाद इथं मूर्ती
आणि शिल्प संशोधन परिषद स्थापन करण्यात आली. दुर्लक्षित पुरातत्त्वीय स्थळांचा शोध
घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी या परिषदेच्या
माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील, असं परिषदेचे अध्यक्ष
डॉक्टर झाकीर पठाण, उपाध्यक्ष डॉक्टर
स्मिता शिंदे आणि प्रा. संजय पाईकराव यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद इथं काल एकदिवसीय नागरी हक्क परिषद घेण्यात
आली. ‘पर्यावरण आणि वन हक्क कायदा’ या विषयावरील प्राध्यापक विजय दिवाण यांच्या व्याखानानं
परिषदेचा अध्यक्षीय समारोप झाला. वनाचे हक्कदार असलेल्या आदिवासींना वन जमिनींपासून
हुसकावण्यात येत असून या जमिनी उद्योजकांना दिल्या जात असल्याचं दिवाण यावेळी बोलतांना
म्हणाले. परिषदेत विविध सामाजिक विषयांवर तज्ञ मंडळींची व्याख्यानं झाली.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला धर्मशाला इथला
पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द झाला. सतत दोन दिवस सुरु असलेल्या
पावसाने या सामन्यात नाणेफेकही झाली नाही. मालिकेतला दुसरा सामना परवा बुधवारी मोहाली
इथं होणार आहे.
****
भारताच्या सौरभ वर्मानं
व्हिएतनाम ओपन सुपर हंड्रेड स्पर्धेच विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात
सौरभनं चीनच्या सून फेई शिआंगला २१ - १२, १७ - २, २१ - १४ असं पराभूत केलं.
*****
***
No comments:
Post a Comment