Monday, 16 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 जम्मू काश्मीरमधली स्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. आज या संदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला हे निर्देश दिले. राज्यातल्या ८८ टक्के भागातले सर्व निर्बंध हटवले असून स्थिती सामान्य होत आहे, या काळात गोळीबाराची एकही घटना नसल्याचं सरकारनं न्यायालयाला सांगितलं. सर्व स्थानिक वर्तमानपत्रं सुरळीत सुरू असून, सरकार त्यांना आवश्यक ती मदत देत आहे, दूरदर्शन आणि इतर खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या तसंच एफ एम नेटवर्कही सुरळीत सुरू असल्याचं, केंद्र सरकारकडून न्यायालयाला सांगण्यात आलं.

 स्थिती सामान्य करण्यासाठी सरकार करत असलेल्या कार्यवाहीबाबत एक शपथपत्र सादर करण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.

 दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात दाद मागणं कठीण होत आहे, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून अहवाल मागवला आहे.

 जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना जम्मू, अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर जिल्ह्यांना भेटी देण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. या भेटीदरम्यान आझाद तिथल्या नागरिकांशी संवाद साधू शकतात, मात्र त्यांना राजकीय सभा घेण्यास न्यायालयानं मनाई केली आहे.

 दरम्यान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना न्यायालयासमोर हजर करावं, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं, केंद्र सरकार तसंच जम्मू काश्मीर प्रशासनाला नोटीस बजावली आहे. राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर अब्दुल्ला यांना बेकायदेशीररित्या नजरकैदेत ठेवलं असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
****

 दूरदर्शनवरच्या बातमीपत्रांच्या विश्वासार्हतेमुळेच लोक त्यांना प्राधान्य देतात असं केंद्रीय  माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनला साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं विशेष समारंभात ते बोलत होते. सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक  असलेल्या दूरदर्शन आणि आकाशवाणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं.
****

 सांगली जिल्ह्यातले युवा नेते सत्यजित देशमुख यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सत्यजीत देशमुख यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुलणारच असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यात काशिगाव इथं आज पोहचलेल्या भाजपच्या जनादेश यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. देशमुख यांच्यासह शिवाजीराव नाईक पक्षात आल्यामुळे या मतदारसंघाची ताकद वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. दिवंगत  शिवाजीराव देशमुख यांचं स्मारक शिराळा तालुक्यात कोकरुड इथं उभं केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
****

 लष्करी अळीमुळे मका पिकाच्या झालेल्या नुकसानाची पंचनामे करून एकरी 25हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेनं केली आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं तीनशे शेतकऱ्यांनी किसान सभेचं सदस्यत्व घेतलं, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याचे उपाध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही मागणी मान्य न केल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेकडून देण्यात आला.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...