Sunday, 17 November 2019

AIR NEWS, BULLETIN, AURANGABAD 17.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - १७ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर आठ हजार रुपये, तर फळबागा आणि बारमाही पिकांसाठी १८ हजार रुपयांची मदत जाहीर
** संसदेचं उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सदनाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचं आवाहन
** राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीची बैठक तर भाजपचंच सरकार येणार असल्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरूच्चार
आणि
** बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय
****
राज्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांसाठी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल आर्थिक मदतीची घोषणा केली. नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर आठ हजार रुपये, तर फळबागा, बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयाचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा, तसंच नुकसानग्रस्त भागात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी घेतला आहे. या मदतीचं वितरण तातडीनं करण्यात यावं अशा सूचनाही राज्यपालांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यपालांनी जाहीर केलेली ही मदत तुटपुंजी असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. मात्र प्रशासनानं ही मदत तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा सहभाग असलेलं नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असं आश्वासन चव्हाण यांनी दिलं.
****
राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे प्राप्त होताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अधिकची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अन्न नागरिक पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या खैरगाव इथं दानवे यांनी काल नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खैरगाव इथल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं.
दरम्यान, दानवे यांच्या उपस्थितीत काल नांदेड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ९ विधानसभा मतदार संघातला निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी बहुतांश कार्यकर्त्यानी शिवसेनेसोबत युती करून चूक केली अशी खंत व्यक्त केली. ही चूक आगामी काळात सुधारणार असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनादरम्यान सदनाचं कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन केल्याचं बिरला यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, सरकारनंही आज बैठक बोलावली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
राज्यात विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजपात दरी निर्माण झाली असून शिवसेनेचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र दोन्ही पक्षांकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 
दरम्यान, राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता नसल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीची आज पुण्यात बैठक होणार आहे, त्यामुळे पवार हे दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकणार नाही, असं या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पुन्हा व्यक्त केला. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या तीन दिवसांच्या बैठकीच्या समारोप सत्राला काल फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात सर्व पातळ्यांवर पक्ष मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्णय या तीन दिवसांच्या  बैठकीत घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांना पक्षाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले.
****
भारतीय जनता पक्ष हा विचारधारा नसलेला पक्ष असून, अनेक राज्यात भाजपानं वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी केली असल्याचं काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते.  विचारसरणी.वरून इतरांवर टीका करायचं काम भाजपकडून सुरू असून, हे अत्यंत चुकीचं असल्याचं ते म्हणाले. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले.
****
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबतची बैठक काल पुढे ढकलण्यात आली. या पक्षांचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा आणि निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी काल अधिसूचना जारी केली. त्यानुसार आज आणि उद्या उमेदवारी अर्ज वितरित केले जातील, हे अर्ज १८ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जातील. आणि २२ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. परभणी महानगरापलिकेचं महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.
****
नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फुट पडण्याच्या भीतीनं काल भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आलं आहे. २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाआघाडी भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. महापालिकेत सध्या ६५ नगरसेवक असलेल्या भाजपकडे बहुमत आहे. मात्र, राज्यातल्या नव्या सत्ता समीकरणाप्रमाणे शिवसेनेचे ३४, काँग्रेस- राष्ट्रवादी चे १२, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि रिपाईं आठवले गटाचा एक असे सर्व नगरसेवक एकत्र झाल्यास ५५ अशी संख्या होते. अलीकडेचं भाजपाने उमेदवारी नाकारल्यानं बाऴासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यांच्या सोबतच्या भाजपाच्या ७ नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास नकार दिला आहे.
****
बांग्लादेशविरुद्ध इंदूर इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतानं पहिल्या डावात ४९३ धावा केल्या, मात्र प्रत्युत्तरादाखल बांग्लादेशचा दुसरा डाव २१३ धावांतच संपुष्टात आला. दोन सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.
****
राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी काल देशभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शन झाली. औरंगाबाद शहरात भाजप नेते अतुल सावे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यासयासमोर निदर्शनं करण्यात आली. हिंगोली शहरातही आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. परभणी, नाशिक शहरातही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
****
लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या अतिविशेषोपचार शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जात असून गरजू रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल मुंडे, आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ . गिरीष ठाकूर यांनी केलं आहे.
शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तज्ञ डॉक्टर्स या विभागात कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यातल्या नागरी बॅंकाच्या समस्या, उपाय, अडचणी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी लातूर इथं कालपासून सुरू झालेल्या दोन दिवसाच्या कार्यशाळेचं उदघाटन भारतीय रिझर्व बॅंकेचे निवृत्त साहाय्यक व्यवस्थापक कृष्णा स्वामी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर होते. नागरी बॅंकानी कर्ज वितरणासाठीची सुरक्षितता, नफा आणि परतावा या त्रिसुत्रीचा वापर केला तर बॅंका बुडणार नसल्याचं मत नागरी बॅंक व्यवस्थापनाचे अभ्यासक महेश कवठेकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त काल औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेत राजकीय परिस्थिती आणि माध्यमांची भुमिका या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आणि ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 6 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...