Monday, 18 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.11.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - १८ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** संसदेच्या हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात; सरकार सर्व मुद्यांवर चर्चेस तयारः पंतप्रधान
** अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात ‘अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ आणि ‘जमियत उल्मा-ए-हिंद’ संघटना सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार
** सर्वोच्च न्यायालयाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे आज पदभार स्वीकारणार
** राज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक
आणि
** शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. १३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या काळात बैठकांचे २० सत्र होणार आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गेल्या अधिवेशनाप्रमाणे हे ही अधिवेशन यशस्वी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. येत्या २६ तारखेला संविधान दिवस साजरा केला जाणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचीही काल बैठक झाली. या बैठकीला शिवसेना वगळता अन्य सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. यासंदर्भात बोलतांना संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी शिवसेनेनं विरोधी पक्षाची भूमिका घेतली असल्यामुळे त्यानुसार तशी व्यवस्था करण्यात येईल, असं सांगितलं.
राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनीही विविध पक्षांच्या नेत्यांसोबत काल बैठक घेतली. स्थायी समितीच्या बैठकीला खासदार उपस्थित राहत नसल्याबद्दल त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
****
अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात ‘अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं’ सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.  लखनौमध्ये काल बोर्डाची बैठक पार पडली. या निकालातून जागेसंदर्भात कोणताही न्याय झालेला नाही. त्यामुळे फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं बोर्डानं म्हटलं आहे. मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचंही बोर्डानं स्पष्ट केलं आहे.  शरियानुसार मशिदीची जागा ही अल्लाची असून ती इतर कोणालाही देता येत नसल्याचं बोर्डाचे सचिव जफरीयाब जलील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
‘जमियत उल्मा-ए-हिंद’ या मुस्लीम संघटनेनंही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं जमियतचे प्रमुख अर्शद मदानी यांनी सांगितलं.
****
सर्वोच्च न्यायालयाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे आज पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांना शपथ देतील. ते १८ महिने या पदावर राहतील. २३ एप्रिल, २०२१ ला ते सेवानिवृत्त होणार आहेत.
****
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्लीमध्ये, राज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीची काल पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी करुन निवडणूक लढवली असल्यांमुळं दोन्ही पक्ष एकत्रच निर्णय जाहीर करतील, असं ते म्हणाले.
****
हिंदुत्त्वाच्या मुद्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत होणं अशक्य असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जालना इथं काल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 
****
राज्यातला महापूर, अतिवृष्टी आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेल्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका आता टप्याटप्यानं घेण्यात येणार आहेत. कमीत कमी खर्चात आणि जलद गतीनं या निवडणुका होण्यासाठी, मतदान यंत्रांच्या वापराचे प्रयत्न सुरू असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल, कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पात्र मतदार यादी संकेतस्थळावरही टाकणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृती स्थळावर सर्वपक्षीय नेत्यांसह शिवसैनिकांनी काल श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियासह आदरांजली वाहिली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली. फडणवीस हे शिवाजी पार्क इथं आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात श्रद्धांजली वाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्टिटरवर बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.
****
राज्यात उद्यापासून कौमी एकता सप्ताह साजरा केला जाणार आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात राष्ट्रीय एकता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन, दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन, जोपासना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या विविध कार्यालयांत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली जाणार असून, एकात्मता संदेश देणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास, तसंच इतर योजनांतील घरांचं वाटप, भूमिहीन मजूरांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे. गरिबांना कायदेविषयक सहाय्य, चर्चा, सभा, संमेलन, मिरवणुका काढणे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाड्यातल्या १३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांची गरज आहे. त्या उपलब्ध करुन देण्यासाठी १३ कोटी, १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य आणि आरोग्य विषयक समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी केली आहे. मंडळाच्या अपर आयुक्तांकडे त्यांनी याबाबतचं निवेदन दिलं आहे.
****
जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त काल, औरंगाबाद शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली. भडकलगेट पासून सुरु झालेल्या, या फेरीचा मिलकॉर्नर मार्गे नागसेनवन इथं समारोप झाला. २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान औरंगाबादमधल्या नागसेनवनात ही जागतिक बौद्ध धम्म परिषद होत आहे. परिषदेला देश विदेशातले  उपासक उपस्थित राहणार असून, धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मदेसना हे या परिषदेचं मुख्य आकर्षण असणार आहे.
****
अनंत भालेराव प्रतिष्ठानच्यावतीनं देण्यात येणारा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार मराठीचे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना काल, औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात उद्योगपती मधुकरराव मुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाश्चात्य लेखक आणि साहित्य सिद्धांत आपल्याला माहिती आहेत. पाश्चात्यांच्या सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी भारतीय साहित्याचं कुळ निर्माण करण्याचं आवाहन यावेळी बोलतांना डॉक्टर रसाळ यांनी केलं. रसाळ यांच्या साहित्य समीक्षेवर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश टाकला.
****
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनेअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नऊ दिव्यांग जोडप्यांना विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी काल अनुदानाचं वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी हे वितरण केलं.
****
संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत काल बीड शहरानजिकच्या मांडवजाळी गावातल्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी संवाद साधला.
जिल्हा परिषदेच्या शाळेची तसंच गावातल्या इतर सुविधांचीही पाहणी करण्यात आली
*****
परभणी महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल सुरु झाली. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सहा अर्ज विक्री करण्यात आले, मात्र एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं झालेल्या ६५व्या शालेय राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या औरंगाबाद केंद्राच्या खेळाडू सिद्धी आणि रिद्धी हत्तेकर यांनी सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धेत औरंगाबाद साई केंद्राच्या पाच खेळाडूंनी दहा पदकांची कमाई केली. रिद्धी आणि सिद्धी या दोघींचीही सलग तिसऱ्या वर्षी 'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं यावर्षीचं शैक्षणिक आणि परिक्षा शुल्क माफ करण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
***
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत अपूरी असून, मदत वाढवून देण्याची मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज  देशमुख यांनी केली आहे़. या पावसानं शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावल्याचं देशमुख यांनी नमूद केलं.
****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...