Monday, 18 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.11.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सदनात सकारात्मक चर्चा व्हावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, ते आज सकाळी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. १३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या काळात बैठकांची २० सत्रं होणार आहेत.
****
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचीही काल बैठक झाली. या बैठकीला शिवसेना वगळता अन्य सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. यासंदर्भात बोलतांना संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी शिवसेनेनं विरोधी पक्षाची भूमिका घेतली असल्यामुळे त्यानुसार तशी व्यवस्था करण्यात येईल, असं सांगितलं.
राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनीही विविध पक्षांच्या नेत्यांसोबत काल बैठक घेतली. स्थायी समितीच्या बैठकीला खासदार उपस्थित राहत नसल्याबद्दल त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
****
सर्वोच्च न्यायालयाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शरद बोबडे १८ महिने या पदावर राहतील. २३ एप्रिल, २०२१ ला ते निवृत्त होणार आहेत.
****
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवनानं प्रसिद्ध् केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं शाह यांना माहिती कळवली होती.
****
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्लीमध्ये, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीची काल पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी करुन निवडणूक लढवली असल्यांमुळं दोन्ही पक्ष एकत्रच निर्णय जाहीर करतील, असं ते म्हणाले.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...