Monday, 18 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१८ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत विद्यमान तसंच माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी, सदनातले दिवंगत सदस्य, अरुण जेटली, जगन्नाथ मिश्रा, राम जेठमलानी, गुरुदास दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, भारतीय रिपब्लीनकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवणीला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी, सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतरही नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या माजी सदस्य सुषमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांनी, नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच अध्यक्षांनी सदनाचं प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज सुरू ठेवलं.
शून्य प्रहरापूर्वी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी काश्मीरचा मुद्दा मांडत अब्दुल्ला यांच्यावरचे कथित प्रतिबंध हटवण्याची मागणी केली. द्रमुकचे टी आर बालू यांनी अब्दुल्ला यांच्या प्रकृतीची चौकशी करत, त्यांच्यावर लावलेले प्रतिबंध बेकायदा असल्याचं नमूद केलं. तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनीही अब्दुल्ला यांच्यावरचे प्रतिबंध हटवण्याची मागणी केली.
****
महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना खासदारांनी आज सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते. या पावसामुळे राज्यातल्या ३६ पैकी तीस जिल्ह्यात सुमारे सत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरचं पाच हजार कोटी रुपयाचं उभं पीक नष्ट झाल्याचा अंदाज, सरकारी पत्रकातून वर्तवण्यात आला आहे.
****
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्लीमध्ये, महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी करुन निवडणूक लढवली असल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रच निर्णय जाहीर करतील, असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सांगितलं आहे. दोन्ही पक्षांचे राज्यातले नेतेही या बैठकीला हजर राहण्याची शक्यता या बाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
****
आमदार फुटीच्या भीतीमुळेचं भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेबाबत वक्तव्य करत असल्याचं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज यवतमाळमध्ये बोलत होते. भाजपमधले आमदार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्यामुळेच भाजप नेत्यांमध्ये चलबिचल होत असल्याचं ठाकरे म्हणाले.
****
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य प्रशासनाने जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपये आर्थिक मदत तुटपूंजी असल्याचं सांगत, मराठा क्रांती मोर्चा आणि शेतकरी संघटनांच्या वतीनं औरंगाबाद इथं क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली. शेतकऱ्यांना किमान ५० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची मागणी करत, आंदोलकांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.
****
अहमदनगर शहरातले प्रतिष्ठित उद्योजक करीम हुंडेकरी यांचं  आज पहाटेच्या सुमारास पिस्तुलाच्या धाकाने अपहरण करण्यात आलं. करीम हुंडेकरी आज पहाटे नमाज पठणासाठी मशिदीत जात असतांना, चार ते पाच जणांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना एका गाडीत घालून नेल्याचं, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.
****
राज्यात उद्यापासून कौमी एकता सप्ताह साजरा केला जाणार आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात  विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या विविध कार्यालयांत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली जाणार असून, एकात्मता संदेश देणारे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास, तसंच इतर योजनांतील घरांचं वाटप, भूमिहीन मजूरांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...