Saturday, 16 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टर आठ हजार रूपये दोन हेक्टरपर्यंत तर फऴबागांना प्रती हेक्टर १८ हजार रूपये दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याची घोषणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज केली आहे. सोबतच या नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आकारण्यात येणारं महसुली शुल्क माफ करण्यात आलं आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा-महाविद्यालयांचं शुल्कही माफ करण्यात आले आहे. ही मदत शेतकऱ्यांना तत्काऴ वितरित करण्याच्या सूचनाही राज्यपालांनी दिल्या आहेत.
****
भाजप हा विचारधारा नसलेला पक्ष असून, अनेक राज्यात भाजपनं वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी केली आहे. आता मात्र विचारसरणी वरून इतरांवर टीका करायचं काम भाजपकडून सुरू आहे, आणि हे अत्यंत चुकीचं असल्याचं काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं.
****
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तिन्ही पक्षांचं एक शिष्टमंडळ आज दुपारी साडेचार वाजता राज्यपालांची भेट घेणार होतं. मात्र, उपरोक्त तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा आणि निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे राज्यपालांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
****
आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन आहे. उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी माध्यमांच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते आज पत्रकारिता दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एक समारंभात बोलत होते. उद्योग समूह आणि राजकारणी लोक देखील त्यांची स्वत:ची माध्यमं सुरू करत आहेत. अशा माध्यमांद्वारे ते पत्रकारितेच्या मूल्यांशी तडजोड करत स्वत:चं हित जोपासत असल्याचं नायडू यावेळी म्हणाले. त्यामुळे अतिरंजित बातम्या, पूर्वग्रहदूषित बातम्या आणि पेड न्यूज माध्यमांसमोर मोठं आव्हान असल्याचंही ते म्हणाले. पेड न्यूजपेक्षा खोट्या बातम्यांचा धोका मोठा असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
****
पत्रकारानं बातमी तयार करण्याअगोदर बातमीसंबंधीचे सर्व तथ्य पडताळायला हवे जेणे करून खोट्या बातमीचा प्रसार टाळला जाऊ शकतो, असं जेष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी मिशनमध्ये राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते. कोणत्याही माहितीबाबत संशय घेणे हे पत्रकारितेचे सर्वात मोठे मूल्य असून त्यामुळेच कोणत्याही वास्तव परिस्थितीचा ठाव घेता येऊ शकतो, असंही ते यावेळी म्हणाले.
****
परभणी महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी आज अधिसूचना जारी केली आहे. त्या नुसार १७ नोव्हेंबर आणि १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत आहे. २२ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागामार्फत १४ नोव्हेंबर रोजी परभणी महानगरापलिकेचं महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. पिठासीन अधीकारी तथा जिल्हाधीकारी वैध उमेदवारांचे नाव वाचून दाखवतील. त्यानंतर १५ मिनि़टांत अर्ज मागे घेता येतील, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फाटाफूट होण्याच्या भीतीने आज भाजपच्या नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आलं आहे. २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाआघाडी भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. महापालिकेत सध्या ६५ नगरसेवक असलेल्या भाजपकडे बहुमत आहे. मात्र, राज्यातल्या नव्या सत्ता समीकरणाप्रमाणे शिवसेनेचे ३४, काँग्रेस- राष्ट्रवादीचे १२, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि रिपाईं आठवले गटाचा एक असे सर्व एकत्र झाल्यास ५५ अशी संख्या होते. अलीकडेचं भाजपाने उमेदवारी नाकारल्यानं बाऴासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यांच्या सोबतच्या भाजपाच्या ७ नगरसेवकांनी सहलीवर जाण्यास नकार दिला आहे.
****
भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या इंदौर इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज बांग्लादेशचा एक डाव आणि १३० धावांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात ४९३ धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरादाखल बांग्लादेशचा दुसरा डाव २१३ धावांत संपुष्टात आला. दोन सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.
****
राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी नाशिक भाजपच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...